सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच 100 ई-बसगाड्या! चार्जिंग स्टेशनसाठी जागा निश्चित; सध्या धावतात फक्त 21 बस, पण चालक- वाहक नसल्याने दुपारून बंद असतात निम्म्या गाड्या

हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांसाठी शहर बससेवा वाढवण्यासाठी केंद्राच्या ‘पीएम ई-बस सेवा योजने’अंतर्गत सोलापूर शहराला १०० ई-बस मिळणार आहेत. महापालिकेच्या परिवहन उपक्रमात सध्या २१ बसगाड्या असून, त्याही १५ वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत.
Electric Bus
Electric BusSakal
Updated on

सोलापूर : हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांसाठी शहर बससेवा वाढवण्यासाठी केंद्राच्या ‘पीएम ई-बस सेवा योजने’अंतर्गत सोलापूर शहराला १०० ई-बस मिळणार आहेत. महापालिकेच्या परिवहन उपक्रमात सध्या २१ बसगाड्या असून, त्याही १५ वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. त्या मध्येच बंद पडतात आणि त्यामुळे चालक देखील वैतागले आहेत. प्रवाशांची मागणी आहे, पण गाड्या वेळेत आणि पुरेशा नसल्याने प्रवासी रिक्षातून जातात. दरम्यान, आता ई-बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली वाढल्या असून, पहिल्या टप्प्यात चार्जिंग स्टेशन उभारणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

जवाहरलाल नेहरू नगरोत्थान योजनेतून यापूर्वी सोलापूर महापालिकेला १०० बसगाड्या मिळाल्या होत्या आणि त्यावेळी प्रवाशांची संख्या देखील वाढून दरवर्षी अंदाजे २१ कोटींचे उत्पन्न मिळायचे. पण, लांबपल्ल्याच्या त्या गाड्या फार काळ टिकल्या नाहीत. आता नऊ व १२ मीटर लांबीच्या १०० ई-बस मिळणार असून, त्यासाठी शहर व ग्रामीणमधील ४६ मार्ग उपलब्ध आहेत. दरम्यान, सध्याच्या परिवहन उपक्रमाला चालक व वाहक पुरविण्यासाठी मक्तेदार नेमले, पण त्यांच्याकडून मनुष्यबळ पुरवठा होत नसल्याने दुपारी आठ-दहा गाड्या बंद ठेवाव्या लागतात आणि अवेळी सुटणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांची पसंती बसगाड्यांना राहिलेली नाही. पण, १०० ई-बस आल्यानंतर वेळेत प्रत्येक मार्गावर गाड्या सोडल्यास हमखास प्रवाशांची संख्या वाढेल, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे. प्रवाशांची गरज ओळखून आता महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या नेतृत्वात काही महिन्यात सोलापूर शहरात ई-बस सेवा सुरू होईल, याचीही अधिकाऱ्यांना खात्री आहे. त्यादृष्टीने नुकतीच ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली असून, चार्जिंग स्टेशनची जागा देखील फायनल करण्यात आली आहे.

जागेची पाहणी झाली, आता महापालिकेच्या निर्णयानुसार कामाला सुरवात

महापालिकेच्या वतीने ई-बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारावे लागणार असून, त्यासंदर्भात बैठक पार पडली आहे. जागेची पाहणी देखील झाली आहे. आगामी काही दिवसांत त्याची तयारी सुरू होईल.

- संजय शिंदे, कार्यकारी अभियंता, महावितरण, सोलापूर

ठळक बाबी...

  • बुधवार पेठेतील महापालिकेच्या जागेवर चार्जिंग स्टेशन उभारणार

  • १०० ई-बस एकाच ठिकाणी थांबतील अशी त्याठिकाणी व्यवस्था केली जाणार

  • चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी असणार सहा चार्जिंग पॉइंट

  • महावितरण आणणार ३३ केव्ही लाईन; चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी अंदाजे साडेनऊ कोटींचा खर्च

शहरातील ४६ मार्ग निश्चित

सोलापूर शहरातील २२ तर ग्रामीणमधील २४ मार्ग आहेत. या मार्गावर ठराविक वेळेनुसार बसगाड्या सोडल्यास प्रवाशांची संख्या वाढून चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. महापालिकेने ई-बससाठी पाठवलेला प्रस्ताव केंद्राने मंजूर केला असून, काही महिन्यात चार्जिंग स्टेशनची उभारणी झाल्यावर ई-बस मिळतील. १०० बसमधील ६० बसगाड्या नऊ मीटर तर ४० बसगाड्या १२ मीटर लांबीच्या असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com