Kartiki Ekadashi 2023 : विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात अडीच लाख भाविक दाखल

नवमी दिवशी विठुरायाच्या दर्शनासाठी अकरा तासांचा अवधी
2 5 lakhs devotees in pandharpur on eve of kartiki ekadashi 2023 vitthal rukimini mandir samiti
2 5 lakhs devotees in pandharpur on eve of kartiki ekadashi 2023 vitthal rukimini mandir samitiSakal
Updated on

पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून सुमारे दोन ते अडीच लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज कार्तिकी नवमी दिवशी सातव्या क्रमांकाच्या शेडपर्यंत गेली असून विठुरायाच्या दर्शनासाठी आज अकरा तास लागत होते.

आषाढी, कार्तिकी आहे माझे घरी, आणिक न करि तीर्थव्रत, या भावनेने राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्तिकी यात्रेसाठी भाविक येथे येऊ लागले आहेत. यात्रेच्या निमित्ताने सोडण्यात येत असलेल्या एसटी आणि रेल्वेच्या यात्रा स्पेशल गाड्यांमुळे भाविकांची सोय झाली आहे. त्याशिवाय शेकडो खासगी वाहनातून भाविक आले असून ठिकठिकाणाहून निघालेल्या पायी दिंड्याही येथे पोचू लागल्या आहेत.

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दहा पत्राशेड उभा केले आहेत. मंगळवारी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सातव्या क्रमांकाच्या पत्राशेडपर्यंत गेली होती. जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे, दर्शन रांगेत अंतर पडू नये, रांग वेगाने पुढे सरकावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेले रामाप्पा देनाप्पा चव्हाण (रा. सर्जापूर, ता. गजेंद्रगड, जि. गदग, कर्नाटक) यांना विचारले असता ते म्हणाले, रात्री एक वाजता सात नंबरच्या पत्राशेडमध्ये दर्शन रांगेत उभा राहिलो होतो. अकरा तासानंतर आज दुपारी बारा वाजता दर्शन झाले. दर्शन रांगेत नेहमी पेक्षा चांगली व्यवस्था करण्यात आली आहे.

तगडा पोलिस बंदोबस्त

यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी, कुठेही चोरीसारख्या घटना घडू नयेत यासाठी साध्या वेशातील पोलिस गर्दीच्या ठिकाणी जागोजागी थांबून लक्ष ठेवणार आहेत. यात्रेसाठीचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

यात्रेसाठी एक पोलिस अधीक्षक, एक अप्पर पोलिस अधीक्षक, तेरा पोलिस उपअधीक्षक, २८ पोलिस निरीक्षक, ११३ सहायक पोलिस निरीक्षक, तीन हजार पोलिस कर्मचारी, बाराशे होमगार्ड, बीडीडीएस पथक, एसआरपीएफ, वाहतूक पोलिस असा बंदोबस्त कार्यान्वित करण्यात आला आहे. दरम्यान, आज श्री. सरदेशपांडे तसेच अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी सर्वत्र फिरून पोलिस बंदोबस्ताची पाहणी केली.

वाहतूक सुरळीत

स्टेशन रस्ता, प्रदक्षिणा मार्ग या भागात आज पोलिस आणि नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणे काढण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी मोहीम राबविण्यात आली. परगावहून आलेले विक्रेते रस्त्यावर बसून दुकाने थाटतात. त्यामुळे भाविकांना चालणे देखील मुश्कील होते. हे लक्षात घेऊन या विक्रेत्यांना प्रमुख रस्त्यावर बसण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे आज दिसत होते. त्यामुळे गर्दी वाढलेली असताना देखील वाहतूक सुरळीत होती.

चंद्रभागेत पाणी पोचण्याची प्रतीक्षा

कार्तिकी यात्रेसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाच हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. तथापि आज कार्तिकी नवमीपर्यंत हे पाणी पंढरपुरात पोचले नव्हते. त्यामुळे यात्रेसाठी दाखल झालेल्या वारकऱ्यांना आज नदी पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्यातच स्नान करावे लागत होते. धरणातून सोडलेले पाणी मंगळवारी रात्री उशिरा पंढरपुरात पोचेल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.