तब्बल 23 नवीन बिअर शॉपी सुरु करण्यास ना हरकत देण्याचा ठराव मंजूर झाला.
पंढरपूर (सोलापूर): आषाढीच्या वेळी पालखी मार्गावर विविध संतांच्या पालख्या वाखरी गावात एकत्र येतात. तिथे लाखो वारकऱ्यांचा पालख्यांसह मुक्काम असतो अशा गावातील बिअर शॉपींना विरोध होण्याऐवजी ग्रामसभेत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 23 नवीन बिअर शॉपी सुरु करण्यास ना हरकत देण्याचा ठराव मंजूर झाला. गुरुवारी (ता.28) झालेल्या ग्रामसभेत या विषयाला विरोध कमी आणि पाठींबा जास्त अशी स्थिती झाली आणि मग प्रत्येकी एक लाख रुपये ग्रामनिधी घेऊन तब्बल 23 बिअरशॉपींना नाहरकत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या नवीन बिअरशॉप सुरु झाल्यास पंढरपूरच्या अगदी वेशीवर प्रवेश करताना वारकऱ्यांना या दुकानांचे बोर्ड पाहत पंढरपुरात प्रवेश करावा लागणार आहे.
(कै.) आर.आर.पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूर शहर आणि लगतच्या गावात परमीटरुम, बिअरशॉपीचे नवीने परवाने दिले जाणार नाहीत असे जाहीर केले होते. त्यामुळे अनेक वर्षे नवीन परवाने दिले गेले नाहीत, परंतु त्यांच्या नंतरच्या काळात नवीन परमीटरुम व बिअरशॉपी सातत्याने वाढत आहेत.
आषाढी यात्रेच्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम वाखरीत असतो. त्यामुळे वाखरीत दहा लाखाहून अधिक भाविकांची गर्दी होत असते. पंढरपूर -पुणे आणि पंढरपूर-सातारा रस्त्यावरील वाखरी हे प्रमुख गाव आहे. पंढरपूर पासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या या गावात संत लक्ष्मणदास महाराजांची समाधी देखील आहे. त्यामुळे तिथे विविध धार्मिक कार्यक्रम सातत्याने सुरु असतात. पालखी मार्गावरील या गावात सध्या तीन बिअर शॉपी आहेत. गुरुवारी गावची ग्रामसभा झाली.
त्यामध्ये गावात नवीन दुकाने सुरु करण्यास विरोध करण्याऐवजी नवीन दुकाने सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची ना हरकत प्रमाणपत्रे देण्यात यावीत, यासाठी जास्ती लोक बोलू लागले त्यामुळे गोंधळ झाला आणि शेवटी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 23 बिअरशॉपींना प्रत्येकी एक लाख रुपये ग्रामनिधी घेऊन नाहरकत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आता असलेल्या तीन आणि नवीन 23 बिअरशॉपी सुरु झाल्यास गावातील लोकसंख्येचा विचार करता 307 लोकांच्या पाठीमागे एक बिअरशॉपी होणार आहे.
ग्रामसभेत महिलांसह अनेकांनी बिअरशॉपींना नाहरकत देण्यास विरोध केला होता परंतु ठराव मंजूर करण्याच्या बाजूने जास्ती लोक बोलू लागले. त्यामुळे प्रत्येकी एक लाख रुपये ग्रामनिधी भरल्यास ना हरकत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच कविता पोरे यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.