शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला असतानाही ग्रामीणचे कारण पुढे करून निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
सोलापूर : शहरातील (Solapur City) कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव आटोक्यात आलेला असतानाही ग्रामीणचे कारण पुढे करून निर्बंध (Lockdown) कायम ठेवण्यात आले आहेत. दुकानांसाठी सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी चारपर्यंतच वेळ असून शनिवार व रविवारी पूर्णपणे दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले असून शहरातील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यावर शुक्रवारी (ता. 6) सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatray Bharane) यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
शहराची लोकसंख्या सद्य:स्थितीत साडेबारा लाखांपर्यंत आहे. परंतु, 2011 नंतर जनगणना झाली नसल्याने वाढलेल्या लोकसंख्येची लिखित स्वरूपात कुठेही नोंद नाही. त्यामुळे 2011 मधील लोकसंख्या ग्राह्य धरून ग्रामीणप्रमाणेच शहरातही तेच निर्बंध कायम ठेवले आहेत. शहरातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट 1.7 टक्के तर ऑक्सिजन बेड्स 94 टक्क्यांपर्यंत शिल्लक आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे सोलापूर शहरातील निर्बंध शिथिल होऊ शकतात. मात्र, लोकसंख्या दहा लाखांहून अधिक असतानाही त्याची नोंद रेकॉर्डवर नसल्याने ग्रामीणमधील निर्बंध शहरातही "जैसे थे'च ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी, व्यापारी-उद्योजक, शाळा, खासगी कोचिंग क्लासेस, फेरीवाले, फळ विक्रेत्यांसह विडी कामगार, बांधकाम कामगार, हातावरील पोट असलेल्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. 6) पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची बैठक होणार आहे. या बैठकीतील निर्णय आपत्ती व्यवस्थापन व सार्वजनिक आरोग्य विभागाला कळवला जाणार आहे. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात जुलै महिन्यात 369 रुग्ण आढळले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने येथील निर्बंध शिथिल करण्याची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील निर्बंध शिथिल करण्यासंबंधी शंभर टक्के सकारात्मक निर्णय होईल.
- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री
माळशिरस, पंढरपुरात कडक निर्बंध?
जुलैमध्ये ग्रामीणमध्ये 12 हजार 698 रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे 136 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, माळशिरस तालुक्यात जुलैमध्ये साडेतीन हजार, पंढरपूर तालुक्यातील दोन हजार 587, माढा तालुक्यात 1400, सांगोला तालुक्यात एक हजार 622 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील रुग्णवाढ कायम आहे. पंढरपुरात एंट्री करताना दुचाकीस्वारांना रॅपिड ऍटिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून या दोन्ही तालुक्यांत पुन्हा निर्बंध लागू करण्यासंदर्भात शुक्रवारी चर्चा होईल, असेही श्री. भरणे यांनी या वेळी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.