रड्डे (ता. मंगळवेढा) येथील लोखंडे वस्ती परिसरात बुधवारी रात्री वाघ आढळल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली होती.
सोलापूर : रड्डे (ता. मंगळवेढा) (Mangalwedha, Solapur) येथील लोखंडे वस्ती परिसरात बुधवारी रात्री वाघ (Tiger) आढळल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली होती. या अफवेमुळे रड्डे तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, तो वाघ नसून तरस असल्याची माहिती वनविभागाने (Forest Department) दिली आहे. तर खुनेश्वर (ता. मोहोळ) (Mohol) येथे बिबट्याने (Leopard) मारुती चव्हाण यांच्यासोबत चाललेल्या कुत्र्याच्या अंगावर झेप घेतल्याची घटना बुधवारी (ता. 11) सायंकाळी सातच्या दरम्यान. मोहोळ येथील घटनेमुळे व रड्डे येथील वाघाच्या अफवेमुळे मात्र या दोन्ही परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रड्डे येथील लोखंडे वस्ती परिसरात बुधवारी रात्रीच्या आसपास एका युवकाला दूध डेअरीत दूध घालून घरी परत जात असताना वाघसदृश प्राणी दिसून आल्याचे त्याने त्या वाडीवरील ग्रामस्थांना सांगितले. रात्रीची वेळ, वस्तीवर लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य होते. त्यातच वाघ दिसल्याची बातमी संपूर्ण गावामध्ये व परिसरात काही मिनिटांत वाऱ्यासारखी पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे ग्रामस्थांनी घराच्या छतावर बसून रात्र जागून काढली. घटनेची माहिती कळताच सरपंच संजय कोळेकर व गावातील काही ग्रामस्थांनी वस्तीवर जाऊन नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले.
खात्री करून घेण्यासाठी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाचे काशीद, पोकळे या कर्मचाऱ्यांना तातडीने रात्रीच त्या ठिकाणी येऊन पाहणी करत सदर वस्ती परिसरात जागोजागी आढळलेल्या जनावरांच्या पायांचे ठसे घेऊन वरिष्ठांना पाठवून तपास केला. हे ठसे वाघाचे नसून तरसाचे असल्याची महिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. मात्र गुरुवारी (ता. 12) दिवसभर मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील नंदेश्वर, भोसे, शिरनांदगी आदी गावांमध्ये या भीतीपोटी अनेकांनी शेतात कामासाठी जाणे टाळले.
बुधवारी रात्री रड्डे परिसरात राहणाऱ्या युवकास वाघसदृश प्राणी निदर्शनास आल्याची माहिती मिळाली. तातडीने वन विभागाचे कर्मचारी पाठवून त्या प्राण्यांच्या पायांच्या ठशांचे फोटो पाठवले असता त्यावरून तो प्राणी वाघ नसून तरस असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्राण्यापासून परिसरातील ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तरस थेट माणसावर हल्ला न करता मेलेल्या प्राण्याचे मांस खात असते. यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही.
- सुभाष बुरुंगले, वनपरिमंडळ अधिकारी, मंगळवेढा
तर मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर येथे बिबट्याने मारुती चव्हाण यांच्यासोबत चाललेल्या कुत्र्याच्या अंगावर झेप घेतल्याची घटना बुधवारी (ता. 11) सायंकाळी सातच्या दरम्यान. खुनेश्वर येथील शेतकरी मारुती कृष्णा चव्हाण हे सायंकाळी सातच्या सुमारास शेतातून घराकडे चालले होते. मारूती चव्हाण यांच्या पाठीमागे त्यांचा पाळीव कुत्रा चालत होता. अचानक पाच फुटांवरच पाठीमागे चालत असलेल्या कुत्र्याच्या अंगावर बिबट्याने झेप घेतली. परंतु कुत्रा त्याच्या जबड्यात आला नाही. या झटापटीत कुत्र्याच्या पाठीमागच्या पायाला बिबट्याचे दात लागले आहेत. यादरम्यान मारुती चव्हाण यांच्या शेतामध्ये फवारणी करण्यास आलेल्या शिरापूर सो. येथील बंडू शितोळे व महेश गायकवाड या दोघांना चव्हाणने बिबट्या पाहिल्याचे सांगतिले. चव्हाण यांनी अत्यंत जवळून बिबट्याच्या रूपाने यमदूतच पाहिल्याने घाबरून धावताना त्यांचा पूर्ण शर्ट घामाने ओला झाला होता व अस्वस्थता वाढली होती. याप्रसंगी शितोळे व गायकवाड यांनी आपल्या मित्रांना फोन करून सदर घटनास्थळी बोलावून घेतले व नंतर सर्वजण शेताच्या शिवारातून बाहेर पडले. मागील दहा दिवसांपासून बिबट्याने शिरापूर, भांबेवाडी, खुनेश्वर आदी परिसरातच मुक्काम ठोकल्याने शेतकरी व नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.