पुण्याहून सोलापूरकडे जाताना सावळेश्वर टोल नाक्याजवळ दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला.
सोलापूर : पुण्याहून (Pune) सोलापूरकडे (Solapur) जाताना सावळेश्वर टोल नाक्याजवळ दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनांचा भीषण अपघात (Accident) झाला. पुणेहून सोलापूरकडे येणाऱ्या एमएच 12- एसयू 8983 या कारने सोलापूरकडेच जाणाऱ्या दोन दुचाकींना जोराची धडक दिली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर चारजण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (ता. 4) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
सावळेश्वर टोल नाका पास करून सोलापूरकडे जात असताना सावळेश्वर गावच्या पुढील पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. मोहोळहून दुचाकीवरून सोलापूरकडे निघालेले दुचाकीस्वार अचानकपणे रस्त्याच्या मधोमध आले. त्यानंतर मागून येणाऱ्या कारचालकाला त्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातात एमएच 13 बीएस- 3163 ही दुचाकी चक्काचूर झाली. त्या दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, चारचाकीतील दोन्ही एअरबॅग्ज ओपन झाल्या होत्या. कारमधील एकाला किरकोळ दुखापत झाली असून, दुसऱ्या दुचाकीवरील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्या दुचाकीवरील एका महिलेच्या पायाला दुखापत झाली अन् ती प्रचंड घाबरलेली होती, त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले आहे. हा अपघात नेमका पुलावर झाल्याने सोलापूर- पुणे महामार्गावर वाहनांच्या टोलनाकापर्यंत रांगा लागल्या होत्या. मृत तरुण पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील असल्याचे समजते. मृत तरुणाच्या उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले.
अपघातानंतर सावळेश्वर टोल नाक्यावरील राष्ट्रीय महामार्गाचे पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला पाठविले. सहाय्यक पोलिस निरीक्षक आय. एस. सय्यद यांनी अपघात झालेली वाहने बाजूला सारून वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिला. या अपघातामध्ये त्या कारने दुचाकीस्वाराला पुलाच्या कठड्यावर ढकलल्याने त्या कठड्याला धडकून दुचाकी चक्काचूर झाली. पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.
चारचाकीस्वार दिवाळीनिमित्त निघाले होते घरी
पुण्याहून दिवाळीचे फराळ घेऊन चारचाकीतील दोन तरुण सोलापूरकडे येत होते. घरापासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असतानाच हा अपघात झाल्याने त्यांना घरी जाण्याऐवजी पोलिस ठाण्याला जावे लागले. तर दुसरीकडे, टोमॅटो, लसूण आदी घरगुती भाजीपाला घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा वाटेतच अंत झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.