कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असतानाही सोलापूर जिल्ह्यात "शहर मध्य' विधानसभा मतदारसंघापुरतेच अस्तित्व राहिले आहे.
सोलापूर : कॉंग्रेस (Congress) हा राष्ट्रीय पक्ष असतानाही सोलापूर (Solapur) जिल्ह्यात "शहर मध्य' विधानसभा मतदारसंघापुरतेच अस्तित्व राहिले आहे. लोकसभेचा बालेकिल्ला ताब्यात ठेवून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) इतर दोन पक्ष व विरोधकांना शह देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून कॉंग्रेसकडील विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेशवर संधी मिळेल, हा विश्वास फोल ठरला. हातून गेलेला लोकसभेचा बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठीच शहरातील पाच जणांना प्रदेशवर संधी दिल्याची चर्चा आहे.
मागील दोन लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या हातून गेली. भाजपचे उमेदवार ऍड. शरद बनसोडे यांनी 2014 मध्ये आणि 2019 मध्ये भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात एंट्री केली आणि शिंदे यांना पराभव पत्कारावा लागला. दोनदा पराभव झाल्याने व्यथित झालेल्या शिंदे यांनी यापुढे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि तो जाहीर सभेत बोलूनही दाखविला. त्यानंतर त्यांच्या जागेवर कॉंग्रेसकडून दुसरा कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे माजी महापौर ऍड. यू. एन. बेरिया व संजय हेमगड्डी यांनी आमच्या समाजाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी करीत बंडखोरीची भाषा केली. त्यांचा समझोता करण्यात कॉंग्रेस नेत्यांना यश मिळाले, परंतु आगामी निवडणुकीत त्यांना संधी द्यावीच लागेल, असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी शहरातील पाच पदाधिकाऱ्यांना प्रदेश कॉंग्रेसवर संधी दिल्याचीही चर्चा आहे.
महापालिका सत्तेची नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी
कॉंग्रेस प्रदेश कमिटीवर माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर अलका राठोड, किसन मेकाले, नरसिंग असादे व मनीष गडदे यांची निवड झाली आहे. अक्कलकोटचे पंडित सातपुते यांनाही कॉंग्रेसचे पद मिळाले असून माजी आमदार रामहरी रूपनवर यांना प्रदेश उपाध्यक्ष तर धवलसिंह मोहिते-पाटील यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. धवलसिंह यांचा मतदारसंघ सोलापूर लोकसभेत नाही, परंतु त्यांचा संपर्क मोठा असल्याचा लोकसभेला फायदा होईल म्हणून त्यांना संधी मिळाल्याची चर्चा आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत त्या ठिकाणी कॉंग्रेसची सत्ता विशेषत: महापौर व्हावा, याची प्रमुख जबाबदारी या नव्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांना शहराध्यक्ष प्रकाश वाले मदत करतील.
विधानसभेत कॉंग्रेसला तीनपैकी एकच जागा
विधानसभा निवडणुकीतही अक्कलकोट, दक्षिण सोलापूरमध्ये कॉंग्रेस उमेदवारांचा पराभव झाला. भाजपचे नवखे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी रयत क्रांतीकडून निवडणूक लढवत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव केला. कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ऐनवेळी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून नगरसेवक बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी भाजपचे उमेदवार तथा माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा घाम काढला, परंतु त्यात कॉंग्रेस उमेदवाराचा निभाव लागला नाही. दिलासादायक बाब म्हणजे, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी हॅट्ट्रिक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.