सोलापूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे जिल्हा दूध संघाचे चेअरमन झाले आहेत. एकेकाळी आमदार शिंदे यांनी दूध संघाची धुरा सांभाळताना दररोजचे दूध संकलन 30 हजार लिटरवरून तीन लाख लिटरपर्यंत नेले होते. पण, त्यानंतर काही वर्षांपासून दूध संघ अडचणीत आला आणि दूध संकलन 20 ते 22 हजार लिटरपर्यंत खाली आले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाला पुन्हा एकदा उर्जितावस्था आणून दाखवू, अशी ग्वाही नुतन अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली. वडिलांनी यशाच्या शिखरावर पोहचविलेला दूध संघ रणजितसिंह हे पुन्हा त्याच जागेवर नेतील, असा विश्वास सर्वांनाच वाटू लागला आहे.
जिल्हा दूध संघाच्या नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड व सत्कार समारंभाचा कार्यक्रम मंगळवारी (ता. 8) दूध संघाच्या सोलापुरातील कार्यालयात पार पडला. दूध संघाच्या अध्यक्षपदी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह यांची तर उपाध्यक्षपदी मोहोळचे दिपक माळी यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी अध्यक्ष श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, दिपक साळुंखे-पाटील, सुरेश हसापुरे, चंद्रकांत देशमुख, योगेश सोपल, प्रकाश चवरे, लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबा करांडे, अशोक देवकते आदी उपस्थित होते.
दूध संघाचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, दूध संघ खूप अडचणीत असून त्याला उर्जितावस्था आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेतेमंडळींकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाईल. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कामगारांच्या मदतीने दूध संकलन वाढविण्याची कार्यवाही तत्काळ हाती घेतली जाईल. शेतकऱ्यांना खासगी दूध संघांच्या बरोबरीने दर देऊन 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर दूध संघ चालविला जाईल.
खासगी दूध संघांशी स्पर्धा करताना जिल्हा दूध संघाला अतिशय काटेकोर नियोजन करून काटकसर करावी लागणार आहे. सध्या दूध संकलन 20 हजार लिटरपर्यंतच असून आमदार बबनराव शिंदेंच्या कार्यकाळात ते संकलन तीन लाख लिटरपर्यंत पोहचले होते. ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील. शासन दरबारी जे प्रश्न असतील ते आम्ही नेतेमंडळी सोडवू, पण मनापासून प्रयत्न केल्यास निश्चितपणे दूध संघ उर्जितावस्थेत येईल.
- दिलीप सोपल, माजी मंत्री
दूध संघाची परिस्थिती कठीण असून बाजारात अनेक स्पर्धक निर्माण झाले आहेत. त्यांच्यावर मात करून जिल्हा दूध संघ उर्जितावस्थेत आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, असा विश्वास आहे. त्यांना आम्ही सर्वजण निश्चितपणे मदत करू. दुधाला चांगला दर देऊन शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करावा लागेल. आपल्याकडे पावडर निर्मितीचा प्लॅण्ट नाही, त्यामुळे बाहेरील उद्योगातून पावडर तयार करून घ्यावी.
- बबनराव शिंदे, आमदार
दर महिन्याला आढावा घेतला जाईल
जिल्हा दूध संघावर नवे संचालक मंडळ विराजमान झाले असून कारभार सुधारण्यासाठी सर्वांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. त्यासाठी दरमहा संघाच्या प्रगतीचा आढवा घेण्यासाठी बैठक होईल. जेणेकरून अडचणी समजून घेऊन त्या सोडविता येतील. दूध संघाची ठिकठिकाणी जवळपास दोनशे कोटींची मालमत्ता आहे. जिल्हाभरात विविध तालुक्यांमध्ये दूध संकलन केंद्रे असून एक पशुखाद्य निर्मितीचा कारखानादेखील आहे. त्याचे विश्वस्त म्हणून सर्वांनी चांगले काम करून दूध संघाला उर्जितावस्था आणावी, असे आवाहन यावेळी वरिष्ठ नेतेमंडळींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.