अक्कलकोट : माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (Sidramappa Patil) यांनी अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Akkalkot Bazar Samiti Election) स्पष्ट बहुमत मिळवून विरोधी सर्वपक्षीय आघाडीला जोरदार दणका दिला. आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetty) यांच्या ‘रसद’मुळे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी विरोधी पक्षाची मजबूत ‘तटबंदी’ उद्ध्वस्त केली. सर्वपक्षीय आघाडीच्या नेतेमंडळींना ‘ओव्हर कॉन्फिडेन्स’ नडला.
अक्कलकोट बाजार समितीची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. दोन्ही गटांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक जिल्हाभर गाजत होती. दोन्ही गटांनी अत्यंत घासून ही निवडणूक होणार असल्याचे अप्रत्यक्ष मान्य केलेले होते. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे ८५ वर्षीय असूनही निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. तर विरोधात सर्वपक्षीय आघाडीने पॅनेल उभे केलेले होते.
काँग्रेसचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, भाजपचे आनंद तानवडे, राष्ट्रवादीचे दिलीप सिद्धे, शिवसेना शिंदे गटाचे संजय देशमुख, जनसेवा संघटनेचे तुकाराम बिराजदार व साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे गोकूळ शुगरचे दत्ता शिंदे व कपिल शिंदे आदींनी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून माजी आमदार पाटलांपुढे आव्हान उभे केले होते. त्यास माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा सक्रिय पाठिंबा होता.
सर्वपक्षीय आघाडीत एकापेक्षा एक दिग्गज नेतेमंडळी असतानासुद्धा अति आत्मविश्वासामुळे पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणाहून रसद मिळत असतानासुद्धा सर्वपक्षीय आघाडीचे काही उमेदवार वैयक्तिक मते मागत होती. सोसायटी मतदारसंघात ११ पैकी १० जागा माजी आमदार पाटलांच्या गटाने जिंकून सहकारात ‘मै नही तो कौन...’ असे म्हणत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
सर्वपक्षीय आघाडीच्या केवळ मल्लिकार्जुन पाटील यांनाच यश मिळाले. भाजपच्या सोसायटी मतदारसंघातील शेवटच्या विजयी उमेदवाराला ३४० मते मिळाली तर भाजपचे नेते आनंद तानवडे यांचे काका बसवराज तानवडे यांना ३३४ मते मिळाली. अवघ्या सहा मतांनी त्यांचा पराभव झाला. तर तडवळ भागातील सुरेश गड्डी, भावी सभापती अशी प्रसिद्धी मिळालेल्या आघाडीच्या कपिल शिंदे यांना ३३१ मते मिळून नऊ मतांनी त्यांचा पराभव झाला. या सर्व उमेदवारांना ‘क्रॉस व्होटिंग’चा फटका बसला.
सर्वपक्षीय आघाडीचे नेतृत्व करणारे दुसऱ्या फळीतील नेते माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना ३५७ मते सोसायटी मतदारसंघात मिळाली. ते सर्वाधिक मते मिळविणाऱ्या ‘टॉप थ्री’ विजयी उमेदवारांमध्ये मोडतात. पण त्यांना मिळालेली अधिकची मते इतर उमेदवारांना मिळू शकली नसल्याने सर्वपक्षीय आघाडीचे तीन-चार उमेदवार विजयापर्यंत पोचू शकले नाहीत.
व्यापारी मतदारसंघात सर्वपक्षीय आघाडीने उमेदवार न दिल्यामुळे भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. अपक्ष उमेदवार विजयकुमार कापसे यांच्या पाठीशी बहुसंख्य व्यापारी असतानासुद्धा बसवराज माशाळे व श्रीशैल घेवारे यांनी चमत्कार केला व विजय खेचून आणला. सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघात माजी नगराध्यक्षा सुवर्णा मलगोंडा या पाच उमेदवारांत चार नंबरवर गेल्या. या मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार शकुंतला खरात या अवघ्या तीन मतांनी पराभूत झाल्या. ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण चार जागांवर सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने सोसायटीवर वर्चस्व भाजपचे तर ग्रामपंचायतीवर वर्चस्व काँग्रेसचे असल्याचे सिद्ध झाले.
माजी आमदार पाटील गटाचे अनेक उमेदवार ३ ते १५ मतांच्या अंतराने विजयी झाल्याने त्यांचा निसटता विजय झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी माजी आमदार पाटील यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे हा विजय साकार झाल्याचे बोलले जाते. आमदार कल्याणशेट्टी जर तटस्थ राहिले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते. सहकारातील बलाढ्य नेते सिद्रामप्पा पाटील यांच्या विजयात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच माजी आमदार पाटील यांनी ‘माझी ही शेवटची निवडणूक आहे’ असे भावनिक साद मतदारांना घातल्याचा फायदाही त्यांना झाला.
‘गोकूळ’च्या साखरेचा आस्वाद घेऊन काहींनी ‘क्रॉस व्होटिंग’ करून पुन्हा शिंदेंच्या पदरी ‘पराभवाचे गिफ्ट’ दिले. अक्कलकोट बाजार समितीच्या १८ संचालकांमध्ये मराठा समाजातील एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. अक्कलकोट मार्केट कमिटीच्या विजयाचा परिणाम आगामी अक्कलकोट नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर होण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.