Politics
PoliticsEsakal

करेक्‍ट कार्यक्रम कुणाचा? 2 मे रोजी कळणार मतदारांचा फैसला

पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लागले सर्वांचे लक्ष
Published on

ब्रह्मपुरी (सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने राज्याच्या सध्याच्या राजकारणात मोठा परिणाम होण्याची शक्‍यता नसली तरीही, या प्रचारात भाजपच्या नेत्यांनी "ही जागा निवडून द्या, राज्यातील पुढील करेक्‍ट कार्यक्रम मी करतो', असे ठामपणे जाहीर सभेत सांगितले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडीने ही निवडणूक ताकदीने लढवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत करेक्‍ट कार्यक्रम कोणाचा होणार? याची उत्सुकता राज्याला लागली आहे.

सध्या कोरोना संसर्गाने राज्याला विळखा घातला आहे. रोज राज्यात पन्नास ते साठ हजारांवर करोनाबाधित आढळत आहेत. मृत्यूचा आकडादेखील वाढत आहे. यामुळे राज्यातील सरकार, विरोधक, नेते आणि जनताही चिंताक्रांत झाली आहे. आरोग्य यंत्रणा तोकड्या कर्मचाऱ्यांमुळे कोलमडून पडली आहे. हे सारे एकीकडे चित्र असताना पंढरपूर - मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाचा आणि या मतदारसंघाचा जणू काहीच संबंध नाही, या पद्धतीने या भागात पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडवला गेला.

Politics
पुजाऱ्यास गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न! भंडारकवठेतील सात जणांविरुद्ध गुन्हा

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात आमदार भारत भालके यांनी 2019 वर्षी हॅट्ट्रिक केली. रिडालोस, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तीन पक्षांत प्रवास करून तालुक्‍यातील विविध विकास कामे करत सामान्य जनतेच्या जोरावर मातब्बर उमेदवारांचा पराभव करून ते राज्यात जॉईंट किलर बनले होते. पण, कोरोनावर मात केल्यानंतरही त्यांना प्रकृतीने साथ दिली नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले आणि या विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली.

Politics
पुण्याहून गावी निघालेल्या चुलत भावंडांचा अपघाती मृत्यू

राजकीय परंपरेप्रमाणे त्यांचे वारसदार भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी राष्ट्रवादीची असली तरी नव्या समीकरणाप्रमाणे त्यांना पाठिंबा मात्र महाविकास आघाडीचा मिळाला. त्यांच्या विरोधात भाजपने उद्योगपती असलेल्या समाधान आवताडे या ताकदीच्या उमेदवारास मैदानात उतरवले. खरी लढत भालके आणि आवताडे अशी असली तरी त्याला अनेक छुपे कांगोरे होते. तसेच या निवडणुकीत छुपे राजकारण अधिक गाजले.

पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाचा नवा आमदार ठरविण्यासाठी ऐन कडक उन्हाळ्यात शनिवारी चुरशीने 68 टक्के मतदान झाले. प्रचाराचा धुरळा गुरुवारीच खाली बसला. खरं तर ही एका विधानसभेची पोटनिवडणूक, पण जणू या निकालाने राज्याचे राजकारणच बदलणार आहे या पद्धतीने पंधरा दिवस प्रचाराचे रान उठविण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे, कॉंग्रेस नेते नानासाहेब पटोले, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांनी मतदारसंघ पिंजून काढला. त्याला प्रत्त्युतर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेकांनी गल्लीबोळातील पायऱ्या झिजवल्या. "तुम्ही विजयी कौल द्या, आम्ही राज्यात करेक्‍ट कार्यक्रम करतो' असे सांगून राज्याच्या राजकारणात ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने झाला. मतदारसंघातील प्रश्नांपेक्षा राज्य आणि केंद्रावर टीका करून लोकांची करमणूक केली.

अपक्षांचा फटका कोणाला?

दिवंगत भालके यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत भगीरथ भालके यांनी प्रचारात आघाडी घेतली. तरीही त्यांना मतविभागणीची भीती आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेने केलेल्या बंडखोरीचा त्यांना त्रास होणार आहे. पण, भाजपने आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत रणनीती आखात उमेदवार समाधान आवताडे कुठे तरी समाधानी होण्यासारखे परिस्थिती असताना त्यांच्या घरातील अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी बंडाचा झेंडा उभारला. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आवताडे यांच्यामुळेच प्रशांत परिचारकांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ते आता त्यांना किती मनापासून मदत करणार? पंढरपूरकरांना मंगळवेढ्याचा भूमिपुत्र चालणार का, हा मोठा प्रश्न आहे. सध्याची परिस्थितीत मंगळवेढा तालुक्‍यात दोन्हीही उमेदवारांची काट्याची टक्कर असून अपक्ष उमेदवारांचा फटका कोणाला बसतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पंढरपूर शहर अन्‌ तालुक्‍यावर विजयाचे गणित

मागील निवडणुकीत पंढरपूर तालुक्‍यात आवताडेंना मोठ्या प्रमाणात मतदानाचा फटका बसला होता. या वेळी मात्र दोन्हीही उमेदवारांच्या विजयाची मदार पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील मतदानावर असून कोणी किती ताकद लावली? हे निकालानंतरच कळणार आहे. पण आवताडे यांना पंढरपुरात दोन निवडणुकीत फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या वेळी काय होणार, यावरच निकाल अवलंबून राहणार आहे. तसेच दोन्ही उमेदवार हे साखर सम्राट आहेत. दोघांनीही शेतकऱ्यांना एफआरपी दिली नाही. या प्रश्नावर स्वाभिमानी संघटनेचा उमेदवार या निवडणुकीत उतरला असला तरी तो फक्त कुणाची किती मते खाणार, एवढीच उत्सूकता आहे.

बातमीदार : दावल इनामदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.