कुर्डुवाडी : दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असलेल्या फळांच्या राजाचे म्हणजेच आंब्याचे बाजारामध्ये आगमन झाले आहे. सध्या कमी आवक व एक दोन प्रकारचेच आंबे उपलब्ध असल्याने खवय्ये कुर्डुवाडीकर देवगड, रत्नागिरी हापूस, पायरी व केशरच्या प्रतीक्षेत आहेत. आयुर्वेदीकदृष्ट्या रक्तवर्धक, अ, क जीवनसत्वांनी समृद्ध असलेल्या शक्तीवर्धक आंब्याचा रस उन्हाळ्यात खवय्यांच्या ताटातील मुख्य पदार्थ असतो.
आंबा हे फळ न आवडणारी व्यक्ती दुर्मिळच आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सुखद असणारी बाब म्हणजे विविध प्रकारच्या आंब्याची मुबलक प्रमाणातील उपलब्धता होय. उन्हाळ्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आंबाप्रेमी मार्केटमध्ये आंबे येण्याची वाट पाहत असतात. मार्च महिन्याच्या मध्यापासूनच आंब्याचे वेध लागलेले असतात. कुर्डुवाडीच्या बाजारात दरवर्षी रत्नागिरी, देवगड हापूस, पायरी, कर्नाटक हापूस, केशर, लंगडा, गुजरातचा दशेरी, आम्रपाली, लालबाग, तोतापूरी, नीलम, बदाम असे विविध प्रकारचे आंबे मिळतात.
परिसरातील आंब्यांच्या काही बागा आहेत. त्याठिकाणी बहुतांश केशर मिळतो. परंतु, सध्या बाजारात लालबाग व बदाम या मोजक्याच आंब्यांची आवक झाली आहे. यंदा आंब्यांची आवक कमी होणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. गतवर्षी आंब्यांचे दर साधारणपणे देवगड हापूस ८०० ते १ हजार २०० रुपये प्रतिडझन, केशर २०० ते २५० रुपये प्रतिकलो, लालबाग १२० ते १५० रुपये प्रतिकिलो, साधारणपणे सीझनच्या शेवटच्या टप्प्यात आलेले दशेरी, लंगडा, आम्रपाली १०० रुपये प्रतिकिलो या प्रकारे होते. यंदा आवक किती होईल त्यानुसार दरात बदल होतो.
आरोग्याच्या दृष्टीने आंब्यांचे महत्त्व
वैद्य डॉ. सचिन गोडसे म्हणाले आयुर्वेदिकदृष्ट्या पिकलेला आंबा गोड, रुचकर, शक्तीवर्धक आहे. लोह असल्याने आंबा रक्तवर्धक आहे. डोळ्यासाठी उपयुक्त असलेले अ जीवनसत्व आंब्यामध्ये व त्वचा, दात, हिरड्यांसाठी तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी असलेले क जीवनसत्व कैरीमध्ये मुबलक आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांच्या जखमा भरुन येण्यासाठी आंब्याची राख उपयुक्त आहे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता झाल्यास कैरीची पन्हे उपयुक्त आहे. एप्रिल महिन्यात मधूर, शक्तीवर्धक असलेल्या विविध प्रकारच्या आंब्यांची कुर्डुवाडीकर आतुरतेने वाट पाहत आहेत.
सध्या बाजारात लालबाग विक्रीस आला आहे. काही दिवसातच आमच्याकडे रत्नागिरी, देवगड, गुजरात येथील इतर सर्व प्रकारचे आंबे विक्रीस येतील.
- सुनील गोरे व रतन राऊत, श्री महालक्ष्मी फ्रूट कंपनी, कुर्डुवाडी
मला व माझ्या कुटुंबातील सर्वांना आंब्यांचा रस खूप आवडतो. आंब्यांचा सीझन असेपर्यंत एक दिवसही आंबा खाल्ल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बाजारात आंबे येण्याची वाट पाहत आहोत.
- श्रीराम म्हमाणे, ग्राहक, कुर्डुवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.