Ashadhi Ekadashi 2022 : वेलू गेला गगनावरी

जगतातील चिरशक्ती अतिशय रंजक आहे
Ashadhi Ekadashi 2022
Ashadhi Ekadashi 2022 sakal
Updated on

जगतातील चिरशक्ती अतिशय रंजक आहे, शिवाय विश्‍वातील आहे त्याचेच कौतुक माउलीने गायिले आहे. ‘वेलु गेला गगनावरी’ हा लेख म्हणजे माउलींच्या रचनेचा व त्यांच्या तत्त्वज्ञानाचा वेगळ्या पैलूने घेतलेला वेध आहे. भक्ती, तत्त्वज्ञान आणि विज्ञान या तिन्ही घटकांना स्पर्श करणारी ही रचना एक वेगळ्याच भावविश्‍वात घेऊन जाते.

‘इवलेसे रोप लावियेले द्वारी

तयाचा वेलु गेला गगनावरी

मोगरा फुलला मोगरा फुलला

फुले वेचिता अतिभारु कळियासी आला

मनाचिये गुंती गंुफियेला शेला

बाप रखुदेविवरु विठ्ठली अर्पिला'

संत ज्ञानेश्‍वर रचित ही रचना नितांत सुंदर असून, प्रत्येक चरणातून त्यांच्या प्रतिभासंपन्नतेचा ‘अक्षर’ सुगंध दरवळतो आहे असे वाटते. ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि भक्ती अंगाने प्रगट झालेला त्यांचा अनुभव विलक्षणपणे शब्दा-शब्दातून बहरलेला दिसून येतो. त्यांच्या अनुभवातील चिरंतन आणि शाश्‍वत निसर्गातील चमत्कारच संवाद साधतो आहे नि काही विशेष सांगू पाहत आहे. ते म्हणतात, ‘पहा! काय आश्‍चर्य! एक मोगऱ्याचे लहानसे रोप दारात लावले आणि पाहता-पाहता ती ‘वेल गगनावरी’ गेली. आकाशव्‍याप्त झाली.

इतकेच नव्‍हे तर त्या विशालकाय वेलीला मोगऱ्याच्या फुलांचा बहरच लगडला. कितीही वेचली तरी कळ्यांचा बहर संपता संपत नाही. तेव्‍हा ती फुलं मनाच्या धाग्यात सुंदरपणे गुंफून एक सुरेख शेला तयार केला नि बाप रखुदेविवरु चरणी अर्पिला.

माउलींनी लावलेल्या इवल्याशा रोपाचे अनेक पैलूंनी विचार करता येतो. एका छोट्या रचनेतून त्यांची उच्च कोटीतील भक्ती व त्यांना प्राप्त दिव्‍य अनुभूतीच प्रगट झाली आहे. माउलींनी लावलेले हे इवलेसे रोप आत्मविद्येचे आहे, भक्तीचे आहे, तत्त्वज्ञानेचे आहे, तसेच त्यात सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्यही दडलेले अाहे. भक्तीच्या अंगाने या रचनेचा विचार केला असता भक्तीचे नितांत सुंदर रोप अंतरंगात विस्तारले की भक्त ‘आत्मज्ञानी’ होतो. त्याच्या ठायी ‘जीव’ आणि ‘शिव’ हा भेद उरतच नाही. जसजसा भक्त (साधक, उपासक) त्या पथावरून मार्गस्थ होत जातो तसतसा त्याच्या अंत:करणात अद्वैताचा मोगरा आणखीनच बहरत (उन्नत) जातो. ती फुले कितीही वेचली (अनुभवली) तरी त्याचा बहर वाढत जातो. मनातील द्वैतभाव नष्ट होतो. तेव्‍हा आकारव्‍याप्त परब्रह्मचरणी (विठ्ठल) अद्वैताचा हा शेला समर्पित केला.

इवल्याशा रोपाचा आणखी एक पैलू असा की, नामस्मरण भक्तीचा अानंदसुख भोगण्यासाठी देहाच्या द्‌वारी ‘नामवेदीचे’ रोपण केले आहे. हरिनामाचे रोपटे लावल्यानेच त्याच्या सुगंधाचा बहर आसमंतात भरून उरला आहे.

भक्तीच्या निरंतर वृत्तीमुळे विकारांची निवृत्ती होते. सबंध देहात भक्तीचा चैतन्यदायी प्रवाह वाहू लागतो नि तो सतत ईश्वरचरणी राहतो.

‘इवलेसे रोप...’ हे माउलींचे निसर्गकाव्‍य आहे. त्यांच्या आत्मसाक्षात्काराचे गूढ उकलणारी ही रचना वाचताना मनात एक वेगळेच चैतन्य सळसळते. मनातील प्रसन्नता आणखी उद्दीपित होते. माउलींनी ‘इवलेसे रोप’ याद्‌वारे विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडले आहे. त्यांचे शब्दसामर्थ्य इतके विशाल नि भव्‍य आहे की, साऱ्या जगताचा ‘पसारा’ त्या नाजूक लहानशा रोपात सामावला अाहे. सबंध ब्रह्मांडात खूप मोठी सर्जक शक्ती भरून उरली आहे. त्यामुळे एका बीजाला अंकुर फुटतो. एक चैतन्यपूर्ण जीव जन्माला येतो. अगणित ‘जीवन’ चेतनेने फुलून येतात. निसर्गातील चैतन्यशक्ती विश्‍वव्‍यापी आहे. विश्‍वातीत आहे. माउलींनी याच चिरंजीव सर्जनशील शक्तीचे व्‍यापकत्व विशद करून त्याचे कौतुक गायिले आहे. या अल्पाक्षरी काव्‍यातून जणू चेतनामयी विश्‍वाची क्रमवार संरचना किंवा उत्क्रांतीचे शब्दा शब्दात उत्क्रांत झाल्याचे दिसून येते. रोपाचे रोपण, (बीजाचे रोप), रोपाचे वेलीत रूपांतर (सृष्टी परिवर्तन) नि ते गगनापर्यंत पोचणे (प्रगती, उन्नती) व सृष्टीतील महाचैतन्यदायी, विलक्षण सर्जक शक्ती आणि त्याचे विशालत्व, त्याचे ब्रह्मांडावरील नियंत्रण आदींचा विस्तार या काव्यात गुंफला आहे.

विश्‍व विस्तारण्याआधी ते बीज स्वरूपात होते. त्या पश्‍चात विश्‍वाचे ते छोटे रोपटे विस्तारत त्याचे भव्‍य, दिव्‍य व अद्‌भुत ब्रह्मांडात रूपांतर झाले. ब्रह्मांडातील सूर्य, ग्रह, तारे अवकाशात पसरलेले महाकाय जाळे, कालांतराने पृथ्वीवर सजीवांची अंडज, पिंडज, स्वेदज, उद्‌भिज अशी उत्क्रांती झाली. मोगरा फुलावा त्याप्रमाणे पंचविषयात्मक जग वृद्धिंगत होत गेले. ते एवढे प्रचंड वाढले की, अतिशय भोग घेऊनही ते संपेना. सर्व इंद्रिये थकून जातात, परंतु विषय मात्र न सरता आव्‍हान देत तसाच उभा राहतो तेव्‍हा मनाच्या साहाय्याने सर्वच विषयांचा शेला गुंफून सच्चिदानंद चरणी अर्पण करावा एवढा विशाल अर्थ माउलींच्या रचनेत दडला आहे. त्यांच्या काव्‍यातील गुह्यार्थ चर्मचक्षूला कळून येत नाही.

त्याकरिता अनुभवसिद्ध ज्ञानचक्षूंच्या कक्षा रुंद कराव्‍या लागतात. यावरूनच माउलींच्या काव्‍यातील प्रतिभासामर्थ्य व अनुभूतीसामर्थ्य किती होती याची प्रचिती येते. रचना वाचायला रसाळ, ओघवती व तितकीच सोपी वाटते; परंतु त्यातील गुढार्थाचे उकल करताना मोठी तारांबळ उडते. प्रत्येक ओळीतील अवलोकनात आलेल्या अर्थाचा वेध घेताना बुद्धीची कार्यशक्तीच खुंटल्यासारखी वाटते. त्यांच्या वाणीतील अर्थ ग्रहण करताना पंच ज्ञानेंद्रिये देखील थिटी पडतात. थोडक्यात, माउलींचे हे ‘विश्‍वात्मक’, ‘आत्मज्ञानात्म’ रोप व पुढे गगनभरारी घेणारी वेल अनेक अंगाने सुगंधित करते नि आजही तो गंध त्यांच्या ‘अक्षर’ वाङ्‌मयातून निरंतर दरवळत आहे. ‘परब्रह्माचा’ विलक्षण अनुभव देणारी ही रचना एक अनामिक भावविश्‍वात घेऊन जाते, एवढे मात्र निश्‍चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.