वारीची प्रेरणा देणाऱ्या संतांनी परमार्थाचा निश्चितपणे अंगीकार केला. पण, त्यांनी प्रपंचाचा निषेध केला नाही. ‘प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही’ अशी ललकारी त्यांनी दिली. एका दिवंगत इतिहासतज्ज्ञांनी ‘संतांनी महाराष्ट्राला आळशी बनवलं’ अशी हेतुपुरस्सर केलेली मांडणी ही सत्याचा सर्वथा अपलाप करणारी आहे. कारण परमार्थ प्रपंचापासून पळ काढून करण्याचा विषय नसून, तो प्रपंचाला दोषरहित बनवण्याचा स्त्रोत आहे, ही शिकवण संतांनी दिली. याचा प्रत्यक्ष पडताळा आपल्याला वारीत घेता येतो. याची पुष्टी करणारी प्रमाणं आपल्याला संतवाङ्मयात ठिकठिकाणी आढळतात.
जगद्गुरू तुकोबाराय,
‘मढे झाकुनीया करावी पेरणी’
या शब्दात कर्माची प्रेरणा देतात. तर संत ज्ञानेश्वर माऊली
‘कर्मे ईशू भजावा’
असा उपदेश करतात.
तया सर्वात्मका ईश्वरा!
स्वकर्म कुसुमांची वीरा!
या ओवीत ते स्वतःच्या कर्तव्यकर्माच्या फुलांनीच ईश्वराची पूजा बांधा, असं सांगतात. सावता महाराजांनी
कांदा मुळा भाजी!
अवघी विठाबाई माझी!!
असं म्हटलंय. संतांनी परमार्थासोबत प्रपंचाची नीट सांगड कशी घातली, याचे नेमके दर्शन वारीत घडते.
पायी वारीच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर कष्टकरी, श्रमिक, शेतकरी वर्ग सहभागी होतात. प्रपंचातली आवश्यक कामे पूर्ण करून व व्यवसायाची नीट व्यवस्था लावून ते आलेले असतात. उदरभरणासाठी कष्ट करण्यावाचून पर्याय नसणाऱ्यांची संख्या यात लक्षणीय असते. एकप्रकारे वारी या वर्गाला जीवनऊर्जा पुरविणारे रसायन आहे, असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. म्हणजेच वारी केवळ आध्यात्मिक आविष्कार नसून, तो इहवादी जीवनशैलीला पूरक ठरणारा मेळावा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
वारीच्या प्रचंड समुदायामध्ये पूर्वी ‘नाही रे’ वर्गाचं आधिक्य ठळकपणे जाणवत असे. मात्र, हल्ली भौतिकदृष्ट्या संपन्न असणारा ‘आहे रे’ वर्ग मोठ्या प्रमाणात वारी सोहळ्याकडे वळताना दिसतो. अनेक प्रकारची उपलब्धता असताना हा वर्ग एका अपूर्णतेच्या भावनेने ग्रासलेला असतो. ज्या समाधानाचा पाठलाग करण्यासाठी आपण धडपडतो, ते समाधान प्रत्यक्षात अनुभवाला येत नाही, ही जाणीव एका टप्प्यावर त्यांना होते. याचवेळी अभावग्रस्त व प्रतिकूलता असणारा ‘नाही रे’ वर्ग निष्ठेने वारीधर्माचं आचरण का करतो, हा प्रश्न त्यांना खुणावतो. त्यांच्यात मग ‘सुखी माणसाचा सदरा’ शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना मिळणारं आत्मिक समाधान आपल्यालाही लाभावं या लालसेपोटी अलीकडे संपन्न लोक निष्ठेने वारीकडे वळताना दिसतात. यामुळे सामाजिक दरी कमी होऊन संतांना अपेक्षित समता प्रस्थापित होण्याला मदत होते, हे सुचिन्ह मानावे लागेल.
वारी साहसवादी वा रंजनवादी माध्यम नसून, ती एक गंभीरपणे करण्याची साधना आहे. जीव हा शिवाचा अंश आहे आणि नदीची धाव जशी समुद्राकडे असते तशी प्रत्येक जीवाची धाव शिवस्वरूपात विलीन होण्याकडे असते, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. वारी जीवाने शिवाचा गंभीरतेने घेतलेला शोध आहे. आपले घरादार आणि संसाराचा काही काळ विसर पाडून आपलं मूळ स्वरूप असलेल्या देवाकडे भक्तीच्या मार्गावरून जाणे हा वारीचा खरा उद्देश. म्हणजेच आपल्या हरवलेल्या ध्येयाची संत आपल्याला ओळख करून देतात. आपल्याला त्या ध्येयाकडे मार्गस्थ करतात. सासरच्या जाचातून त्रासलेली लेक ज्या ओढीने माहेरच्या दिशेकडे वाटचाल करते, तीच ओढ व आर्तता पंढरीची वाटचाल करताना वारकऱ्यांमध्ये असते.
पंढरीये माझे माहेर साजणी
या शब्दात संतांनी माहेराकडची ही आर्त वाटचाल विषद केली.
वारीची साधना करताना भक्तीच्या मूळ भावनेचे भान सुटता कामा नये. अन्यथा मूळ हेतू हरवून वारी एकप्रकारे केवळ वरपांगी स्तोम बनेल. वारीच्या या मार्गाचं संतांनी सांगितलेल्या विधीनुसार समरसून आचरण करून मिळणारं आत्मिक समाधान प्रत्यक्षात अनुभवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. हाच अनुभव खऱ्या अर्थाने जीवनाला संपन्न बनवेल.
श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर,मेहकर, जि. बुलडाणा
‘पंढरीची वारी’ महाराष्ट्राचा प्राणबिंदू. संतांनी शिकविलेला हा ईश्वरभक्तीचा आचारमार्ग. मात्र, तो निवृत्तीवादाच्या मर्यादित धारणेचा परिपोष करीत नाही. तर तो जीवनाच्या समग्र स्वीकाराचा राजमार्ग आहे. बोलीभाषेत सांगायचे तर वारी हा केवळ ‘देव देव’ करण्याचा विषय नसून, त्यासोबतच संसाराच्या रहाटगाडग्याला नैतिक मूल्यांचा ‘पायवाट’ प्रदान करणारा जीवनधर्म आहे. म्हणूनच समाजाच्या विविध स्तरातील, विभिन्न वैचारिकतेच्या समाजघटकांना वारी सारखीच आकर्षित करते. सर्वांना मायेच्या ममतेने आपल्यात सामावून घेते ती वारी. जय जय पांडुरंग हरी...
- ह. भ. प. गोपाल महाराज पितळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.