Ashadhi Wari 2023 - सोलापूर राजकुमार घाडगे- सकाळ वृत्तसेवा पंढरपूर,ता.२५: आषाढी यात्रेला येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने ६५ एकर (भक्ती सागर) परिसरामध्ये ४९७ प्लॉटसच्या माध्यमातून मुक्कामाची सोय उपलब्ध केली आहे. या प्लॉटसच्या माध्यमातून सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांची राहण्याची सोय होणार आहे.
आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यातूनही लाखो भाविकांचे पंढरीमध्ये आगमन होणार आहे. महाराष्ट्र शासनाने एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत तर कर्नाटक सरकारने महिलांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे यावर्षी महिला वारकऱ्यांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ६५ एकर परिसरात यंदा ४९७ प्लॉटस तयार केले आहेत.
दरवर्षी या प्लॉटसमध्ये दिंडी सोबत आलेले वारकरी तंबू व राहूट्या उभारून तेथे यात्रा कालावधीमध्ये मुक्कामी राहतात. यावर्षी देखील आषाढी यात्रा कालावधी मध्ये मुक्कामासाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना प्रशासनाने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शुद्ध पिण्याचे पाणी, २४ तास वीजपुरवठा, मुबलक प्रमाणात स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
हा परिसर स्वच्छ व दुर्गंधी मुक्त असावा याकरिता प्रशासनाच्यावतीने भाविकांसाठी सुमारे १ हजार तीनशे कायमस्वरूपी स्वच्छतागृहे तर तात्पुरती ३०० स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. याशिवाय संपूर्ण परिसरामध्ये आठ ते दहा ठिकाणी हायमास्ट दिवे उभारण्यात आल्याने हा परिसर लख्ख प्रकाशाने उजळून निघाला आहे.
सुमारे सहा वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने ६५ एकर परिसरामध्ये सुमारे ३ हजार झाडांचे वृक्षारोपण केले होते. त्यामुळे परिसरामध्ये मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्यांना घनदाट सावलीचा आधार मिळणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ६५ एकर व पंढरीतील महत्त्वाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी एकूण १४ प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
याशिवाय ६५ एकर मधील आपत्कालीन केंद्राच्या मागील हॉलमध्ये १० बेडचे इमर्जन्सी वैद्यकीय उपचार केंद्र वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. दरम्यान आषाढी यात्रेसाठी आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या गर्दीने 65 कर परिसर गजबजू लागला आहे. * कोट: ६५ एकर मधील सर्व प्लॉटसचे बुकिंग पूर्ण झाले आहे.
या परिसरामध्ये मुक्कामी असणाऱ्या भाविकांना काही अडचण आल्यास अथवा कोणतीही मदत हवी असल्यास आपत्कालीन मदत केंद्रातील अधिकारी वा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. - किशोर बडवे, नायब तहसीलदार, आपत्कालीन मदत केंद्र प्रमुख, ६५ एकर परिसर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.