नातेपुते : हरिनामाचे गोडवे गात पंढरीला निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वैष्णवांच्या मांदियाळीने आता पुणे, सातारा जिल्ह्यातील वाटचाल करून मोठ्या थाटात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. दिवसभराच्या वाटचालीत कडकडीत उन्हात घामाच्या धारांनी डबडबलेले वारकरी धर्मपुरीतील रांगोळ्यांच्या पायघड्या आणि जेसीबीद्वारे केलेल्या पुष्पवृष्टीने सुखावले. इथल्या प्रशस्त महामार्गाचा आनंद घेत वारकरी नातेपुते मुक्कामी विसावले. बरड तळावर सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ यांनी महापूजा केली.
सोहळ्याने सकाळीच वाटचाल सुरू केली. वारी शेवटच्या टप्प्यात आल्याने वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. हरिनामाचे गोडवे गात वारकरी चालत आहेत. शेतशिवारातील वाटचाल करीत काकड्याचे अभंग गात साधुबुवांच्या ओढ्याजवळ वारकऱ्यांनी न्याहारीचा आनंद घेतला. अॅड. संपत कुंभारगावकर यांच्यातर्फे प्रवचन झाले. विसाव्याच्या वेळी पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळी अकरा वाजता पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरीत पोहोचला. तेथे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. राजकीय मंडळींनी अश्वांचे पूजन केले. फटाक्याची आतषबाजी आणि जेसीबीतून रथावर फुलांची उधळण केली. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. विविध शासकीय यंत्रणांतर्फे प्रबोधनपर कार्यक्रम झाले. सातारा जिल्हा प्रशासनाने सोहळ्याला निरोप दिला, तर सोलापूर जिल्हा प्रशासनाने स्वागत केले.
दुपारी बाराच्या सुमारास पालखी धर्मपुरी येथे दुपारच्या विसाव्यासाठी थांबली. तेथील झाडांच्या आश्रयाने वारकऱ्यांनी जेवण आणि विसावा घेतला. धर्मपुरीत पालखी येण्यापूर्वीच परिसरातील भाविकांची रांग लागली होती. परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. पावणेदोनच्या सुमारास पालखीने धर्मपुरी सोडली. सोहळ्याने उन्हातच वाटचाल सुरू केली. नातेपुतेकडे येताना शंभू महादेवाचे शिंगणापूरचे शिखर खुणावत होते. वारकऱ्यांनी मनोमन दर्शन घेत शिंगणापूर फाट्यावर विश्रांती घेतली. त्यानंतर ढगाळ वातावरणात पालखी नातेपुते मुक्कामी पोहोचली.
आज गोल रिंगण
आळंदी ते पंढरपूर वारी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण शुक्रवारी (ता. १२) पुरंदावडेजवळ होणार आहे. सकाळी मांडवी ओढ्यावर जेवण घेऊन सोहळा रिंगणाला पोहोचेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.