Ashadi Ekdashi: आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज व श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यासह मानाच्या पालख्यांचे सोमवारी (ता.१५) वाखरी पालखी तळावर आगमन होणार आहे. वाखरी पालखीतळावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी तेथे वॉटरप्रूफ भव्य असा विश्रांती कक्ष उभारण्यात आला आहे.
आषाढी यात्रेसाठी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २९ जून रोजी तर देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २८ जून रोजी पंढरपूर कडे मार्गस्थ झाला होता. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत सोपान काका, श्री संत मुक्ताबाई, श्री संत एकनाथ,श्री संत निळोबाराय,श्री संत रुक्मिणी माता, श्री संत नामदेव महाराज आदी मानाच्या पालख्यांचे सोमवारी वाखरी पालखी तळावर आगमन होणार आहे.
मानाच्या पालख्या व त्या सोबतच्या दिंड्या मधून सुमारे आठ ते दहा लाख वारकरी वाखरी पालखी तळावर मुक्कामी असणार आहेत. या वारकऱ्यांसाठी सोलापूर जिल्हा परिषद, पंढरपूर नगरपरिषद व वाखरी ग्रामपंचायत यांच्यावतीने पालखीतळावर विज, पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रा कालावधी दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेता यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ भव्य विश्रांती कक्ष उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. तर महिला वारकऱ्यांसाठी देखील यंदा प्रथमच १०० तात्पुरती स्नानगृहे उभारण्यात आली आहेत.
याशिवाय कायमस्वरूपी ३०० तर १ हजार पाचशे तात्पुरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय यंदा प्रथमच वारकऱ्यांना बाटलीबंद पाणी वाटप करण्यात येणार असून रिकाम्या बाटल्यांचे संकलन करण्यासाठी पालखीतळावर नऊ ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत.
वाखरी पालखीतळाच्या शेजारील जागेमध्ये भव्य मंडप उभारण्यात आला असून तेथे वारकऱ्यांसाठी 'पंढरीच्या दारी; आरोग्याची वारी' या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एकंदरीतच मानाच्या पालख्यांच्या स्वागतासाठी वाखरी पालखीतळ सज्ज झाला आहे.
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महावितरणने घेतली खबरदारी: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महावितरणने वाखरी पालखी तळावरील विज पुरवठा करणाऱ्या १०२ खांबावरील तारा काढून त्या ठिकाणी शॉकप्रूफ अशी एबी केबल बसवली आहे. याशिवाय विजेच्या लोखंडी खांबांना प्लास्टिक पाईपचे आवरण देखील बसविण्यात आले आहे.
वाखरी पालखी तळावरील यंदा प्रथमच देण्यात आलेल्या सुविधा: भव्य वॉटरप्रूफ विश्रांती कक्ष, बाटली बंद पिण्याचे पाणी, महिला वारकऱ्यांसाठी स्नानगृहे, एबी केबल द्वारे वीजपुरवठा, ९ प्लास्टिक संकलन केंद्रे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.