अनेक पैलूतून अभिनेता अशोक सराफ व निवेदिता सराफ या दाम्पत्याची प्रगट मुलाखत निर्भेळपणे रसिकांना आनंद देणारी ठरली.
सोलापूर : अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता जोशी (Nivedita Joshi) यांच्यात प्रेमाचे अंकुर फुलायला लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) आणि सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) कारणीभूत ठरले आहेत. 'धूमधडाका' चित्रपटात यदुनाथ जवळकर हे पात्र रंगवणारे अशोक हे निवेदिताला 'तुला इच्छित वर प्राप्त होवो' असा आशीर्वाद देतात. तेव्हा तो मीच असेन हे माहीत असतं तर मी तो सीन केला नसता, असं अशोक सराफांनी मिश्कीलपणे सांगितलं. यावरून मुलाखतीमध्ये हास्याचे फवारे उडाले.
कलेवर निर्व्याज प्रेम... अभिनयाच्या जोडीने फुललेला संसार... कलाक्षेत्रातील सृजन... अपडाउनचे अनुभव... अभिनय क्षेत्रातील अनेक दशकांमध्ये कायम असलेले अस्तित्व... यांसारख्या अनेक पैलूतून अभिनेता अशोक सराफ व निवेदिता सराफ या दाम्पत्याची प्रगट मुलाखत निर्भेळपणे रसिकांना आनंद देणारी ठरली.
या वर्षीच्या "प्रिसिजन गप्पां'चा समारोप "हृदयी वसंत फुलताना' या भन्नाट कार्यक्रमाने झाला. नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजविणाऱ्या अशोक आणि निवेदिता सराफ या लोकप्रिय जोडप्याची प्रकट मुलाखत दाम्पत्य जीवनाचे कंगोरे, व्यक्तिमत्त्वाचे पैलू, संसारातील परस्परांची पूरकता, अभिनयाची मूल्ये, मराठी चित्रपटातील करिअर, कुटुंबातील नात्याची घट्ट वीण अशा अनेक पैलूंद्वारे रंगलेले कथन अभिनेते-निवेदक ऋषीकेश जोशी यांनी फुलवले.
बालपणीच अशोक आणि निवेदिता या दोघांच्याही अवतीभवती अभिनयाची आवड निर्माण व्हावी असं वातावरण होतं. दोन्ही घरचा पाहुणा' हा त्यांचा पहिला सिनेमा असला तरी त्यांना स्टारडम मात्र "पांडू हवालदार'नेच मिळवून दिलं. लहान वयातच लघुनाट्यात काम करणाऱ्या निवेदिता यांनीही पूर्णवेळ अभिनेत्री होण्याचं स्वप्न बाळगलं होतं. वयाच्या दहाव्या वर्षी "अमृतवेल' आणि "हे बंध रेशमाचे' या नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका त्यांनी साकारल्या. मराठी आणि गुजराती रंगभूमीवर पाय रोवल्यानंतरच्या "धूमधडाका'मधून त्यांनी रुपेरी पडद्यावर एंट्री केली.
एकांकिका, संगीत, नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका अशा चहूअंगाने फुलला. लग्नानंतर "तू सुखकर्ता' हा चित्रपट वगळता एकाही चित्रपटात या दोघांनी एकत्र काम करण्याचा न आलेला योग, अशोक सराफ आणि "लिटिल मास्टर' सुनील गावस्कर हे बालपणीचे क्रिकेट खेळणे व "गुरुदक्षिणा' नाटकात काम यांसारख्या प्रसंगातून गप्पांचा रंग चढत गेला.
अभिनयात शोधक व अभ्यासू वृत्तीतून कोणत्याही एका भूमिकेचा शिक्का न लावून घेता प्रत्येक भूमिकेत स्वतःचा अभिनय कसदार करण्याचा अभ्यासूपमा अशोक सराफांनी कायम जपला. तर संसाराच्या जबाबदाऱ्यांचा तोल सांभाळत कलेचे प्लॅटफार्म बदलत भाषांचा अभ्यास, वाचन, पाककला, टीव्ही मालिका करत स्वतःचा वेळ नवनिर्मितीमध्ये घालवणाऱ्या निवेदिता सराफ यांचे जगणे मुलाखतीत उलगडले.
'अशोक सराफ हा स्वतःशी अत्यंत प्रामाणिक असणारा माणूस आहे पण तो अजिबात तंत्रस्नेही नाही' अशी टिप्पणी निवेदिता यांनी नवरोबांबद्दल केली तर "निवेदिता ही खूप संयमी असली तरी वेळ अजिबात पाळत नाही' अशी लाडिक तक्रार अशोकमामांनी मांडली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.