Ayushman Bharat : ‘आयुष्यमान’ कार्डद्वारे एक हजार ३६५ आजारांवर मोफत उपचार

जिल्ह्यातील ५१ रुग्णालयांचा योजनेत समावेश; मुख्यमंत्री सहायता निधीतूनही दोन लाखांची मदत
Ayushman Bharat
Ayushman Bharat Sakal
Updated on

सोलापूर : २०११च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील ३३ लाख ४७ हजार ५५५ लाभार्थी पाच लाखांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र ठरले आहेत. २३ जुलै २०२३च्या शासन निर्णयानुसार आता सर्वांनाच आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. पण, त्यासाठी प्रत्येक लाभार्थीकडे आयुष्यमान गोल्डन कार्ड आवश्यक आहे.

आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून प्रतिवर्ष प्रतिकुटुंब पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासंदर्भात राज्य शासनाने २३ जुलैला स्वतंत्र निर्णय काढला आहे. कर्करोग, बायपास सर्जरीसह तब्बल एक हजार ३६५ आजारांवर रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत.

त्यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रे तथा सेतू सुविधा केंद्रातून लाभार्थी गोल्डन कार्ड काढू शकतो. भविष्यात या योजनेत आणखी रुग्णालये वाढतील. ज्यांना या योजनेतून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घ्यायचे आहेत, त्यांनी गोल्डन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव जोशी यांनी केले आहे.

योजनेतून मोफत उपचारासाठी कोण पात्र?

पिवळे रेशनकार्ड, अंतोद्‌य व अन्नपूर्णा योजनेतील शिधापत्रिकाधारक, केशरी रेशनकार्डधारक, शासकीय अनाथालयातील विद्यार्थी, शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रम, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील पत्रकार व त्यांचे कुटुंब,

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडील नोंदणीकृत कामगार व त्यांचे कुटुंब हे सद्य:स्थितीत या योजनेसाठी पात्र आहेत. आता २३ जुलै २०२३च्या शासन निर्णयानुसार पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांसह शासकीय नोकरदार देखील या योजनेसाठी पात्र असतील, पण त्याची अंमलबजावणी अजून सुरु झालेली नाही.

योजनेत शहरातील ‘ही’ रुग्णालये

कुंभारी अश्विनी ग्रामीण रुग्णालय, रिलायन्स हॉस्पिटल कुंभारी, कासलीवाल बालरुग्णालय, चिडगूपकर रुग्णालय, ह्दयम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, गंगामाई रुग्णालय, सोलापूर कॅन्सर रुग्णालय, सिद्धेश्वर कॅन्सर रुग्णालय, रघोजी किडनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, युगंधर सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल) अशी शहरातील रुग्णालये मोफत उपचाराच्या योजनेत समाविष्ठ आहेत.

मुख्यमंत्री सहायता निधीतूनही २ लाखांची मदत

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडूनही रुग्णांना विविध आजारांसाठी अर्थसहाय केले जाते. सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत १०२ रुग्णालयांची नोंदणी आहे. त्याठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना जास्तीत जास्त दोन लाखांची मदत मिळू शकते. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे रुग्णांनी अर्ज करणे अपेक्षित आहे.

योजनेची जिल्ह्यातील सद्य:स्थिती

२३,४७,५५५ - एकूण लाभार्थी

५१- एकूण रुग्णालये

१३६५- योजनेतील आजार

१०.३०- आतापर्यंत कार्ड काढलेले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.