करमाळा: करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदासंघात शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माजी आमदार नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. तेव्हापासून नारायण पाटील हे महायुतीसोबत राहणार की महाविकास आघाडीत जाणार? याविषयी चर्चा रंगल्या होत्या.
माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर गेले होते. नारायण पाटील यांनी शिवसेनेला सोडणे हे माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीला एक मोठा धक्का बसला आहे. नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अकलूज येथे भेट घेतली असून ते २६ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी (ता. १४) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आज माढ्यात पुन्हा महायुतीला धक्का बसला आहे.
मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. मी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे. तो स्वीकार करावा, असे नारायण पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. नारायण पाटील यांनी २०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवून ते आमदार झाले होते.
विद्यमान आमदार असूनही २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने विशेषतः तानाजी सावंत यांनी नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आणून करमाळा विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत नारायण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. अपक्ष निवडणूक लढवूनही नारायण पाटील यांना ७५००० मते मिळाली होती. ते दुसऱ्या क्रमांकावरती राहिले तर शिवसेनेकडून लढणाऱ्या रश्मी बागल तिसऱ्या क्रमांकावरती राहिल्या.
नारायण पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची येत्या २६ एप्रिल रोजी करमाळ्यात जाहीर सभा होणार आहे. त्या सभेत नारायण पाटील हे पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश करणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमाला नारायण पाटील यांनी हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात त्यांनी भाषण करून आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.