सोलापूर : मानवी जीवनात निरनिराळ्या प्रजातीच्या पक्ष्यांचे अस्तित्व हाच मानव- पक्षी संवादाचा मार्ग आहे, असे मत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यक्त केले.
डॉ. मेतन फाउंडेशन सोलापूर, सामाजिक वनीकरण सोलापूर व महाराष्ट्र वन विभागाच्या सहकार्याने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात तीन दिवसीय 34 वे महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. निनाद शहा, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. राजू कसांबे, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, एमआयटीच्या पर्यावरण विभाग प्रमुख प्रा. स्वाती कराड, एनटीपीसीचे चीफ जनरल मॅनेजर एन. श्रीनिवास राव, किर्लोस्कर कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर विलास खरात उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले, माणसाने साद घातली की निसर्ग प्रतिसाद देतो. पक्षी संवर्धनासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. स्टेट ऑफ इंडियन बर्डस 2020 नुसार पक्ष्यांच्या 101 प्रजाती धोक्यात आहेत. एकुण 79 टक्के प्रजाती या घटल्याचे दिसून आले आहे. तरुण पिढीची या बाबतीतील सजगता मोलाची आहे. सोलापूर हे पक्ष्यांचे माहेरघर आहे. येथील पक्षी वैभव मोठे आहे. पक्ष्यांना पूरक परिसंस्था निर्माण केल्यास पक्षी सहजतेने वावरतील. निसर्गकल्याणा प्रमाणेच मानव कल्याणाचाही हेतू या पक्षीमित्र संमेलनाचा आहे. भारतात या प्रकारचे हे एकमेव संमेलन असल्याचा अभिमान वाटतो. महाराष्ट्र हा पर्यावरण सरंक्षणाबाबत सजग असल्याचे हे द्योतक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले. डॉ. व्यंकटेश मेतन यांनी प्रास्ताविक केले. अभिज भानप यांनी सूत्रसंचालन केले. विनोद कामतकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.