पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यात अटीतटीची लढत झाली. 19 उमेदवारांनी निवडणूक लढवली. परंतु भालके आणि आवताडे या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्येच कॉंटे की टक्कर दिसून आली. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच, या जिद्दीने दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. (कै.) भारत भालके यांच्या विषयीची सहानुभूती मोठ्या प्रमाणावर होती. तथापि, मतदानाच्या दिवशी भगीरथ भालके यांची यंत्रणा कमी पडली. त्यामुळे दोन्ही बाजूने प्रतिष्ठेच्या केल्या गेलेल्या या लढतीत कोण बाजी मारणार? या विषयी कमालीची उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांची युती घडवून आणली. त्यामुळे भगीरथ भालके यांच्यापुढे आवताडे व परिचारकांच्या एकत्रित शक्तीला तोंड देण्याचे मोठे आव्हान उभा राहिले होते.
निवडणूक काळात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदींनी अनेक वेळा पंढरपूर- मंगळवेढ्याचे दौरे केले. त्यामुळे भगीरथ भालके यांना हत्तीचे बळ मिळाले. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पक्षाची सर्व यंत्रणा आवताडे यांच्या पाठीशी उभी केल्याने आवताडेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधून दोन्ही बाजूने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली गेल्याने चुरस कमालीची वाढली.
आमदार प्रशांत परिचारक आणि युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी त्यांची संपूर्ण ताकद समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभी केली होती. आमदार प्रशांत परिचारक यांनी तर शेवटच्या प्रचार सभेत उपस्थितीत मतदारांना माजी आमदार (कै.) सुधाकरपंतांची शपथ घालून भावनिक केले. त्यामुळे परिचारक समर्थक कार्यकर्त्यांनी आवताडे यांच्यासाठी आणखी गांभीर्याने काम केल्याचे दिसून आले. समाधान आवताडे यांना मागील दोन विधानसभा निवडणुकांचा अनुभव असल्याने त्यांनी नियोजनबद्ध यंत्रणा राबवल्याचे दिसले.
राजकारणात तुलनेने नवखे असलेल्या भगीरथ यांनीही अतिशय संयमाने आणि विरोधकांवर टीका करण्याचे टाळून आपला प्रचार केला. नव्या- जुन्या कार्यकर्त्याना बरोबर घेऊन त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. परंतु निवडणुकीच्या निकालाच्या दृष्टीने मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदाना दिवशीच्या घडामोडींना खूप महत्त्व असते. आमदार (कै.) भारत भालके हे या दोन दिवसांच्या काळात सतर्क राहून एकहाती यंत्रणा हलवून कार्यकर्त्यांना चार्ज ठेवत असत. परंतु, या वेळी या दोन दिवसांत भगीरथ भालके यांना कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी खूप धावपळ करावी लागली, अशी चर्चा आहे. त्याचा परिणाम मतदानाच्या दिवशी बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांच्या कामावर झाला. आवताडे यांच्या तुलनेत भगीरथ भालके यांची ती यंत्रणा तुलनेने कमी पडली. त्यामुळे मतदाना दिवशी काही बूथवर भालके यांचे कार्यकर्ते अत्यल्प दिसले. अशी वस्तुस्थिती असली तरी देखील (कै.) भारत भालके यांच्या कामाला लोक विसरले नाहीत. त्यामुळे भगीरथच बाजी मारतील, असा विश्वास भालके समर्थकांमधून व्यक्त होत आहे, तर आवताडे आणि परिचारक समर्थकांतून यंदा विजयाचा गुलाल निश्चित असल्याचा दावा केला जात आहे.
भालकेंचे काम की आवताडे-परिचारकांची एकत्र ताकद?
एकंदरीतच, या निवडणुकीत (कै.) भारत भालके यांच्या विषयीची सहानूभूती, अकरा वर्षात आमदार म्हणून त्यांनी केलेले काम अधिक प्रभावी ठरणार? का आवताडे आणि परिचारकांच्या एकत्रित शक्तीचा विजय होणार? याची मतदारांमध्ये उत्सुकता आहे. 2 मे रोजी मतमोजणीनंतर जो निकाल लागेल तो दोन्ही बाजूच्या अस्तित्वाचा आहे, हे निश्चित.
कोणाच्या मतदानात घट?
मतदारसंघात सर्वच गावांत चुरशीने मतदान झाले. 2019 मधील निवडणुकीत 71.71 टक्के मतदानाची नोंद झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वेळी त्यात घट झाली आणि 66.15 टक्के मतदान झाले. कोणाच्या पारड्यातील मतदान घटले आणि त्याचा परिणाम कोणाच्या निकालावर झाला, हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.