महावितरणच्या रडावर शेतकरी ! थकबाकी न भरल्यास कनेक्शन तोड मोहीम
कोणत्याही परिस्थितीत वीजबिल माफ होणार नाही, त्यामुळे आता "वीजबिल भरा अन्यथा अंधारात राहा' ही भूमिका महावितरणने घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सोलापूर : राज्यातील वीज ग्राहकांकडे महावितरणची (MSEDCL) सद्य:स्थितीत जवळपास 45 हजार कोटींची थकबाकी आहे. जिल्हानिहाय अधीक्षक अभियंत्यांना थकबाकी वसुलीचे टार्गेट दिले असून वीजबिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन कापले जात आहे. सध्या घरगुती, व्यापारी व ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईट बिलाची वसुली सुरू आहे. बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन कट केले जात असून 15 जुलैनंतर शेतीपंपाचे कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू होणार आहे. (Campaign to cut off electricity connection of farmers who are in arrears from MSEDCL)
महावितरणची सर्वाधिक थकबाकी शेतकऱ्यांकडेच आहे. तर लॉकडाउन काळात हाताला काम नसल्याने व दुकाने (व्यवसाय) बंद असल्याने वीजबिल माफ करावे, अशी मागणी झाली. अनेकांना वीजबिल माफ होण्याची आशा असल्याने महावितरणचे बिलच भरले नाही. दुसरीकडे, ग्रामपंचायतींकडेही पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईटची मोठी थकबाकी झाली. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना वीजबिलाची माफी देण्यावरून सरकारने सकारात्मकता दर्शविल्याने शेतकऱ्यांनीही वीजबिल भरण्याकडे पाठ फिरवली. आता महावितरणची थकबाकी पुन्हा वाढल्याने कारभार चालविणे मुश्किलीचे झाले आहे. त्यामुळे टार्गेटनुसार अधिकाऱ्यांनी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वेळेत वीजबिल भरावे, असे आवाहनही महावितरणने केले आहे.
घरगुती, व्यापारी, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईटच्या थकबाकीची वसुली सुरू असून वीजबिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन कट केले जात आहे. कोरोना काळातही महावितरणने नियमित वीजपुरवठा केला, परंतु सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपंपाची थकबाकी वेळेत भरून घ्यावी, अन्यथा त्यांचेही कनेक्शन कट केले जातील.
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर
"वीजबिल भरा अन्यथा अंधारात राहा'
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, हमीभाव मिळेल, लॉकडाउन काळातील वीजबिलात सवलत मिळेल, अशा विविध प्रकारच्या घोषणा नेत्यांनी केल्या. मात्र, घोषणा करणे हा राजकारणाचा भाग असून त्यावर विश्वास न ठेवता ग्राहकांनी वीजबिल भरणे क्रमप्राप्त असल्याचा सल्लाही महावितरणचे अधिकारी, कर्मचारी थकबाकीदारांना देत असल्याची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत वीजबिल माफ होणार नाही, त्यामुळे आता "वीजबिल भरा अन्यथा अंधारात राहा' ही भूमिका महावितरणने घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका ट्रान्स्फॉर्मरवर आठ-दहा शेतकऱ्यांचे कनेक्शन असेल आणि त्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी वीजबिल नाही भरले, तर त्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.