बोंडले (सोलापूर) : गावातील कायदा, सुव्यवस्था व महसूल यावर देखरेख राहावी तसेच गुन्हेगारी, बेकायदेशीर व्यवसाय व अवैध धंदेवाल्यांवर चाफ बसावा यासाठी शासनाच्या वतीने गावागावांत निवड प्रक्रियाद्वारे पोलिस पाटलांची पदे भरण्यात आली. यामुळे उच्चशिक्षित तरुण- तरुणींना गावातील उच्च मानाच्या पोलिस पाटील पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली. परंतु, अशाच गावगाड्यातील उच्चपदस्थ दसूर (ता. माळशिरस) येथील संशयित आरोपी पोलिस पाटील महेश शिंदे यांच्यावर अवैध वाळू धंद्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. या कारवाईत मुद्देमालासह बारा लाख 32 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील खळवे येथील भीमा नदीसह दसूर व तोंडले - बोंडले येथील ओढ्यातील पाण्याची पातळी कमी झाली की, येथील वाळू माफियांकडून अवैधरीत्या पात्रातील वाळू उत्खनन करून विक्री करण्याचा धंदा केला जातो. अशाप्रकारे शुक्रवारी सायंकाळी दसूर परिसरात बिगर नंबर असलेला ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पकडण्यात आला. यामध्ये वाळूचा अवैध धंदा करणारे संशयित आरोपी पोलिस पाटील महेश अशोक शिंदे (रा. दसूर) व त्यांचा साथीदार मयूर ऊर्फ सोन्या मारुती चेडे (रा. खळवे) यांच्यावर वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर या कारवाईत सात हजारांच्या वाळूच्या मुद्देमालासह दहा लाख रुपयांचा ट्रॅक्टर, दोन लाख रुपयांची ट्रॉली, पंचवीस हजारांची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, शहर पोलिस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलिस हेड कॉन्स्टेबल नारायण गोरेकर, मोहन मनसावले, धनंजय गाडे, पोलिस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांच्या पथकाने केली आहे.
अवैध वाळू व्यवसायात पोलिस पाटीलच सामील असल्याने परिसरात हा विषय चर्चेचा झाला असून, अशा अधिकाऱ्यांमुळेच वाळू माफिया मुजोर बनत असल्याचे बोलले जात आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.