सोलापूर जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांसह राज्यातील 60 लाख विद्यार्थ्यांना सोमवारपासून लस टोचली जाईल. त्यासाठी 650 केंद्रे असून ऑनलाइन नोंदणी न केलेल्यांनाही लस टोचली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात 17 केंद्रे आहेत.
सोलापूर : राज्यातील कोरोनाचा (Corona) संसर्ग पुन्हा जोर धरू लागला असून ओमिक्रॉनचा (Omicron) विळखाही घट्ट होऊ लागला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर आता प्राधान्याने 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन लस (Covacin vaccine) टोचली जाणार आहे. त्याची सुरवात 3 जानेवारीपासून होणार असून त्यासाठी राज्यभरात 650 विशेष केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक विशेषत: को-मॉर्बिड रुग्णांनाच (Co-morbid patient) सर्वाधिक धोका झाला. दुसऱ्या लाटेत 35 ते 40 वर्षांवरील तरुणांचे सर्वाधिक मृत्यू झाले. आता तिसऱ्या लाटेत 15 वर्षांवरील मुलांना धोका होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारच्या परवानगीनंतर 3 जानेवारीपासून लस टोचली जाणार आहे. कोविशिल्ड लस (Covishield vaccine) टोचल्यानंतर पुढील 84 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो, परंतु कोवॅक्सिन टोचल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस देता येतो. या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांना ती लस टोचली जाणार असून सध्या राज्यात कोवॅक्सिनचे 45 लाख डोस आहेत. त्या मुलांना शक्य असेल त्याठिकाणी लस टोचली जाणार असून नियोजित केंद्रांशिवाय शाळेतही लसीकरण (Vaccination)कॅम्प घेता येतील का, यादृष्टीने चाचपणी सुरु आहे. त्यामध्ये विशेषत: दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, त्यांना आधारकार्डवरुन (Aadhaar card) जागेवरच लस टोचली जाईल, असेही सांगण्यात आले.
लसीकरणाचे नियोजन...
- 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी- 60.13 लाख
- लसीकरण केंद्रे- 650
- लसीकरणाची सुरवात- 3 जानेवारी
- कोवॅक्सिन लसीचा साठा- 45 लाख
राज्यातील 18 वर्षांवरील जवळपास एक कोटी व्यक्तींनी अजूनही लस टोचलेली नाही. त्यांच्या लसीकरणासोबतच आता सोमवारपासून (ता. 3) 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस टोचली जाणार आहे. राज्यातील जवळपास 60 लाख विद्यार्थ्यांना कोवॅक्सिन लस दिली जाणार असून तीन महिन्यांत ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- डॉ. सचिन देसाई, सहसंचालक, आरोग्य
एक कोटी व्यक्ती लसीकरणापासून दूर
राज्यातील 18 वर्षांवरील नऊ कोटी 14 लाख व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणे अपेक्षित होते. मात्र, राज्यभरात लसीकरणाची नऊ हजार केंद्रे असतानाही जवळपास एक कोटी व्यक्तींनी अजूनपर्यंत एकही डोस टोचलेला नाही. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख लोक आहेत. त्यांना कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील "या' केंद्रावर लस
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, बार्शीतील नागरी आरोग्य दवाखाना, करमाळ्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र, माढ्यातील माढा ग्रामीण रुग्णालय, मोहोळ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, माळशिरस तालुक्यातील अकलूज उपजिल्हा रुग्णालय, मंगळवेढ्यातील मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्तर सोलापुरातील वडाळा ग्रामीण रुग्णालय, सांगोल्यातील गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दक्षिण सोलापुरातील विडी घरकूल व कुंभारी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लस टोचली जाणार आहे. तर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल, विमा रुग्णालय, केअर हॉस्पिटल, शेठ गोविंद रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय, लोकमंगल हॉस्पिटल या सहा केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.