अरण्यऋषी चितमपल्ली, ऍड. रजपूत व शहा दाम्पत्याला महापालिकेकडून मानपत्र प्रदान

Sanman
Sanman
Updated on

सोलापूर : हुतात्मा स्मृती मंदिर येथे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्‍तींना सोलापूर महापालिकेच्या वतीने महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते मानपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी होते. या वेळी आमदार सुभाष देशमुख, पालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, सभागृह नेते श्रीनिवास करली, परिवहन सभापती जय साळुंखे, नगरसेवक रियाज खरादी, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, सुनीता रोटे, फिरदोस पटेल आदी उपस्थित होते. 

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत आणि प्रिसिजन कॅम्पशाफ्टचे यतिन व सुहासिनी शहा यांना महापौर यन्नम यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप व महावस्त्र देऊन गौरविण्यात आले. 

या वेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले, जिल्ह्यात कृषी पर्यटन होण्यासाठी पुढील काळात मोठी संधी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन वाढीसाठी पुढाकार घ्यावा. सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त असूनदेखील सर्वात जास्त साखर कारखाने जिल्ह्यात आहेत. जिल्ह्याला देवदेवतांचा आशीर्वाद असून पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. सोलापुरातील अनेकांनी नावलौकिक कमावला आहे, त्या व्यक्तींची ओळख ही सोलापूरची श्रीमंती असल्याचे सांगून श्री. देशमुख यांनी यतिन शहा यांना दोन-चार फार्म हाउस बांधून त्या ठिकाणी विदेशी लोकांना घेऊन येण्याचे आमत्रंण दिले. 

सत्काराला उत्तर देताना अरण्यऋषी मारुती चितमपल्ली व जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी त्यांच्या आठवणी सांगून महापालिकेचे आभार मानले. याप्रसंगी बोलताना यतिन शहा यांनी, सोलापूरकरांनी सोलापूरबद्दल दिवसातून एकदा तरी चांगले बोलण्याचा नूतन वर्षात संकल्प करावा, असे सांगितले. शेंगा- चटणी व चादर हे सोलापूरचे भूषण असले तरी त्यातून आता बाहेर पडून नवीन क्षेत्रात भरारी घेण्याची गरज असल्याचेही शहा यांनी सांगितले. 

या वेळी मानपत्राचे लिखाण करणारे सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुनील शिनखेडे यांचा महापौर यन्नम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी ही आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. 

मरणोत्तर सन्मानपत्र प्रदान... 
महापालिकेत विविध पदांवर काम करून शहराच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल माजी आमदार युन्नूस शेख यांना आणि "सकाळ'चे बातमीदार विजयकुमार सोनवणे यांचा मरणोत्तर सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला. 

यांचा झाला सन्मानपत्र देऊन सत्कार 
पंचांगकर्ते मोहन दाते, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, राजा माने, विजयकुमार पिसे, प्रशांत जोशी, राजकुमार सारोळे, मनीष केत, समाधान वाघमोडे, साहित्यिक मुसा खान, रक्‍तदाते अशोक नावरे, जलकन्या भक्‍ती जाधव व त्यांचे बंधू, क्रीडा संघटक श्रीकांत ढेपे, समाजसेवक अतिश शिरसट, सुप्रिया बिराजदार, जलतरणपटू सुयश जाधव, ऋतिका श्रीराम, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे, कुस्तीपटू वसंत सरवदे, योगासन खेळाडू तृप्ती आवताडे, मॅरेथॉनपटू साईश्‍वर गुंटूक, जलतरण प्रशिक्षक नारायण जाधव, स्वप्नील हरहरे, हरित वसुंधरा फाउंडेशन, इको फ्रेंडली क्‍लब, राजघराणा प्रतिष्ठान, जयोस्तुते फाउंडेशन 

"सकाळ'चा सन्मान 
सोलापूर स्मार्ट सिटीतील योगदानाबद्दल "सकाळ' सोलापूरचा या वेळी सन्मान करण्यात आला. प्रदूषणविरहित छत्रपती संभाजी महाराज तलाव, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, सोलापूरची सकारात्मक ओळख यासाठी "सकाळ' सोलापूरचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.