काही दिवसांत भाजप, एमआयएमसह इतर काही पक्षातील आजी- माजी नगरसेवक, पदाधिकारी देखील काँग्रेससोबत येतील, असा विश्वास आहे.
सोलापूर : राज्य स्तरावर वज्रमूठ झाली, पण सोलापूर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा शहराध्यक्ष कोण, जिल्हाप्रमुख काय करतात, असे प्रश्न असून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) देखील शांतच आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत (Solapur Municipal Election) सर्वात मोठा पक्ष म्हणून महापौर आपलाच व्हावा, यादृष्टीने शहर काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जातीय समिकरणांची जुळवाजुळव करून काँग्रेसने मागील तीन महिन्यांत दहा नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत.
ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी धनगर समाजाचा चेहरा, सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध असलेला पदाधिकारी म्हणून चेतन नरोटे यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्षाला निश्चित फायदा होईल हा देखील त्यामागील हेतू आहे.
पक्षाने नेमलेल्या नूतन ११ पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाल्याचे बोलले जात आहे. ८ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी शहराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आणि निद्रावस्थेतील शहर काँग्रेस पुन्हा वरचढ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस भवन असो वा जनवात्सल्यवर आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी पहायला मिळते. त्यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांत २३ पेक्षा अधिक आंदोलने झाली असून विशेष बाब म्हणजे त्यावेळी कायकर्त्यांचीच गर्दी पहायला मिळाली.
आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्ट्राँग व्हायची असेल तर जुन्या पदाधिकाऱ्यांना म्हणजेच वर्षानुवर्षे एकाच पदाला चिकटून बसलेल्यांच्या ठिकाणी नव्यांना संधी मिळावी, अशी त्यांचीच भूमिका होती, असेही बोलेल जात आहे. दरम्यान, आता प्रा. अशोक निंबर्गी व चेतन नरोटे या दोघांनी दुसऱ्या पक्षातील ताकदवान पदाधिकारी काँग्रेसमध्ये कसे येतील, यादृष्टीने नियोजन सुरु केल्याचेही चर्चा आहे.
प्रमिला तुपलवंडे : प्रभारी महिला शहराध्यक्ष
जुबेर कुरेशी : अल्पसंख्यांक शहराध्यक्ष
शकील मौलवी : अल्पसंख्यांक उपाध्यक्ष
राजेंद्र शिरकुल : रोजगार व स्वयंरोजगार सेल शहराध्यक्ष
श्रीशैल रणदिवे : शहर सरचिटणीस
गंगाधर गुमटे, विकास येळेगावकर, शकील शेख, सुनिल रसाळे : शहर उपाध्यक्ष
नागनाथ शावणे : प्रभाग २२ अध्यक्ष
नागनाथ कदम : वक्ता सेल शहराध्यक्ष
आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसचाच महापौर व्हावा, याची संपूर्ण जबाबदारी शहराध्यक्ष चेतन नरोटे व प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्या दोघांनी पक्षाच्या सर्वच आजी-माजी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रभागनिहाय संभाव्य उमेदवार फिक्स करण्याचे नियोजन केले आहे.
काही दिवसांत भाजप, एमआयएमसह इतर काही पक्षातील आजी- माजी नगरसेवक, पदाधिकारी देखील काँग्रेससोबत येतील, असा दोघांनाही विश्वास आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा (किमान ६०) हव्या असून त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. जागा वाटपात राष्ट्रवादीचे महेश कोठे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर यांच्यासोबत बोलणी फिस्कटल्यास स्वबळावर लढण्याची देखील तयारी काँग्रेसने ठेवल्याचे बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.