"लग्नाला येऊ नका, असाल तेथूनच आम्हाला आशीर्वाद द्या !'

Wedding
Wedding
Updated on

केत्तूर (सोलापूर) : लग्न पत्रिकेवर आवर्जून "लग्नाला यायचं हं..!' अशी आग्रहाची विनंती केली जाते. परंतु सध्याच्या काळात लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी 50 जणांनाच परवानगी देण्यात आल्याने "लग्नाला येऊ नका, असाल तेथूनच आशीर्वाद द्या' असे म्हणण्याची वेळ वरबाप व वरमाईवर आली आहे. एकूणच कोरोनो महामारीच्या संसर्गामुळे लग्नसमारंभ अडचणीत आले आहेत. त्यामुळे लग्नसमारंभात केल्या जाणाऱ्या बडेजावपणालाही चाप बसला आहे. 

गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सण- समारंभ, यात्रा-जत्रा, मंदिरांबरोबरच लग्न समारंभावर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधाचा सर्वांत जास्त फटका लग्न समारंभांना बसत आहे. 

राज्य व देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असताना आता ग्रामीण भागातही तो मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. या हंगामात लग्न सोहळ्याच्या निमित्ताने कोरोनाचा सर्वाधिक प्रसार होत असल्याचे दिसून आले आहे. लग्न समारंभात हौस व बडेजावपणाच्या नावाखाली याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अनेकांना ते धोकादायक ठरत आहे. भटजीने "सावधान' म्हटले किंवा डॉल्बी सिस्टीम बॅंडवाल्यांनी कितीही "कारभारी दमानं..' म्हटलं तरी लग्न समारंभ कोरोना प्रसारास कारणीभूत ठरत आहेत. याचे भान मात्र कोणालाही नाही, असे दिसत आहे. 

प्रशासनाची भीती, नियम-अटी, निर्बंध घातले तरीही याची काटेकोर अंमलबजावणी मात्र कोठेही होताना दिसत नाही. स्वतःची काळजी स्वतःच घेणे सध्याच्या कसोटीच्या काळात गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, या गोष्टी जाणीवपूर्वक पाळणे गरजेचे असताना या मूलभूत गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. हे दुर्लक्षच कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहे. 

शासन, प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असले तरी नागरिक मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहेत. लग्न समारंभासाठी 50 जणांना आमंत्रण कसे द्यायचे, हाही प्रश्न आहेच. ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक लग्न समारंभांवर अवलंबून असतात. लग्न समारंभातील निर्बंधांमुळे छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. यामध्ये लग्नपत्रिका छपाईवाले, वाजंत्री, घोडेवाला, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, स्टेज सजावट, ब्यूटी पार्लर, मेंदी कारागीर, आचारी, वाढपी, डीजे, बॅंडवाले, हारफूलवाले, कासार, मंगल कार्यालये, मंडपवाले यांच्यासाठी गतवर्षाप्रमाणेच या वर्षीचा लग्न समारंभाचा हंगामही वाया जाणार असल्याने या छोट्या व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. 

प्रशासनाने लग्न समारंभाला 50 जणांची उपस्थिती व मंडप 20 बाय 20 आकाराला परवानगी दिली आहे. हा नियम मोडल्यास दंडात्मक तरतूद आहे. त्यामुळे लग्न समारंभ चारशे ते पाचशे लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात यावी. 
- शंकर गुंजाळ, 
मंडपवाले 

लग्न समारंभासाठी 50 जणांची उपस्थिती असल्याने आचाऱ्याचे महत्त्व संपले आहे. लग्नकरी मंडळी हॉटेलमधून तेवढ्या माणसांचे जेवण मागवत आहेत. त्यामुळे आचाऱ्यांची मात्र पंचाईत झाली आहे. 
- लक्ष्मण खैरे, 
आचारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.