पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती जोरदार हालचाली सुरू असल्या तरी स्थानिक पातळीवर मात्र काम ‘जैसे थे’ स्थितीत आहे.विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्यासाठी राज्य सकारात्मक आहे. यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी केली आहे. टेंडर प्रक्रियेसाठी निधी देखील मंजूर केला आहे.
या परिसरात होणाऱ्या कॉरिडॉरला स्थानिकांनी मात्र कडाडून विरोध केला आहे. त्यांच्या या विरोधामुळे कॉरिडॉरचे काम सध्या तरी थंडावले आहे. उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात ही कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने तशी तयारी देखील सुरू केली आहे. दरम्यान मंदिर परिसरातील स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांनी कॉरिडॉरला विरोध दर्शवला आहे. या स्थानिकांचा वाढता विरोध लक्षात घेता राज्य सरकारने सध्या तरी सावध भूमिका घेतली आहे. परंतु पंढरपुरात कॉरिडॉर व्हावा ही सर्वसामान्य वारकरी आणि भाविकांची मात्र तीव्र इच्छा आहे.
पंढरपुरात वर्षभरात जवळपास एक कोटीहून अधिक भाविक विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येतात. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या मोठ्या यात्रेसाठी पंढरपुरात लाखो भाविक येतात. यामुळे विठ्ठल मंदिर परिसरात मोठी गर्दी होते. गर्दी कमी व्हावी आणि भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे ,यासाठी राज्य सरकारने मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
कॉरिडोर मुळे पंढरपूरच्या विकासाला गती मिळणार आहे. शिवाय इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या देखील वाढणार आहे त्यामुळे एकूणच पंढरपूरच्या अर्थकारणावर देखील याचा परिणाम होणार आहे पंढरपूरच्या विकासाला चालना देणारा हा कॉरिडॉर राज्य सरकारने तातडीने हाती घ्यावा अशी भावना आता सर्वसामान्य वारकरी भाविकांमधून व्यक्त केली जात आहे.
पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षीच्या वारीमध्ये येतात. त्यांच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे होण्याची गरज आहे. स्थानिकांचे म्हणणे एेकून घेत त्यांचा विरोध शांत करून ही कामे वेगाने होण्याची गरज आहे. सध्या लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे शासन हा निर्णय घेईल अशी शक्यता कमी आहे. तरीही वाढत्या गर्दीचा विचार करता कॉरिडॉरचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा अशीही मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.