आमदार रोहित पवारांची टीका! सिद्धेश्वर’च्या चिमणीमागे मोठे राजकारण; 'बोरामणी'साठी खासदार निष्क्रीय

दरवर्षी ४५० कोटींची उलाढाल असलेल्या सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांचे कल्याणच केले. परंतु, विमानसेवेला पर्याय असतानाही एकजण स्वत:च्या खासगी कारखान्यासाठी, दुसरा काडादी घराण्यासोबतचा जुना वाद ‘चिमणी’च्या आडून खेळत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
2NCP_MLA_Rohit_Pawar
2NCP_MLA_Rohit_Pawarsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील २७ हजार शेतकरी सभासद असलेल्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे शेतकऱ्यांच्या जीवनात ५२ वर्षांपासून मोठे योगदान राहिले आहे. दरवर्षी ४५० कोटींची उलाढाल असलेल्या सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांचे कल्याणच केले. परंतु, विमानसेवेला पर्याय असतानाही एकजण स्वत:च्या खासगी कारखान्यासाठी आणि दुसरा काडादी घराण्यासोबतचा जुना वाद ‘चिमणी’च्या आडून खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार रविवारी (ता.१) सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, महेश कोठे, सुधीर खरटमल, संतोष पवार, किसन जाधव, तौफिक शेख, सिद्धाराम चाकोते, प्रशांत बाबर, अजमल शेख, अयाज दिना, नजीब शेख आदी उपस्थित होते. आमदार पवार पुढे म्हणाले, काडादी घराण्याचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना चांगला दर दिला. सध्या १७ हजारांपेक्षा अधिक शेतकरी त्याठिकाणी ऊस घालतात. काही दिवसांपूर्वी काढलेला मोर्चा कोणा एका नेत्याचा नव्हे, तर शेतकऱ्यांनी स्वत:हून काढलेला होता. विमानसेवेला पर्याय असतानाही काही पुढारी कारखान्याच्या चिमणी पाडण्यावर टपले आहेत. त्यातून कोणाच्या खासगी कारखान्याला ऊस मिळेल, कोणत्या घराण्याचा फायदा होईल, याचा विचार सर्वांनीच करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘नगर’मध्ये फॉरेस्ट कमी झाले, मग सोलापूरला काय अडचण

अहमदनगरमध्ये ‘माळढोक’साठी सर्वाधिक क्षेत्र आरक्षित असतानाही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून फॉरेस्ट जागेचा तिढा आम्ही सर्वांनी मिळून सोडविला. पण, सोलापूरचा खासदार भाजपचा, आमदारही भाजपचेच अधिक, तरीदेखील बोरामणी विमानतळासाठी फॉरेस्ट जमिनीचा तिढा का सुटत नाही असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप खासदाराने केंद्रात नेटाने प्रयत्न केल्यास निश्चितपणे बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. श्री सिद्धेश्वर कारखान्याला चिमणीशिवाय पर्याय नाही, पण विमानसेवेला पर्याय असतानाही चिमणी पाडण्याचा हट्ट का, यामागे नेमके राजकारण कोण करतयं याचा सर्वांनी अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही कारखान्यासोबत व शेतकऱ्यांच्या बाजूंनी निश्चितपणे उभारू, असेही त्यांनी सांगितले.

चिमणी बेकायदेशीर नाहीच : कोठे

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी बांधकाम करण्यासाठी महापालिकेने त्यावेळी रितसर ‘एनओसी’ दिलेली होती. पण, विमानतळ विकास प्राधिकरणासह अन्य काही परवानग्या घेणे अपेक्षित होते. त्यावेळी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कारखान्याची अडवणूक करण्यात आली. कारखान्याची चिमणी विमानसेवेला अडथळा ठरत नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ७५व्या वाढदिनी ५० पेक्षा अधिक विमाने त्याठिकाणी उतरू शकतात, मग आता चिमणी पाडण्याची मागणी कशासाठी असा प्रश्न उपस्थित करीत महेश कोठे यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखवले.

आमदार रोहित पवार म्हणाले...

  • नागपूर अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी शेतकरी, महिला, युवकांच्या प्रश्नांवर बोलू दिले नाही

  • सत्ताधारी मंत्री, आमदारांच्या सुरक्षेवर कोट्यवधींचा खर्च; सर्वसामान्यांचे सरकारला काहीच देणेघेणे नाही

  • बदला घेण्यासाठी सरकार बनवले; मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही, नाराजी वाढण्याची भाजपला भीती

  • प्रकल्प गुजरातला गेले, सीमावाद, महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणे, तरीही भाजप नेते गप्पच

  • मुंबई व महाराष्ट्राची बदनामी आणि महत्त्व कमी करण्याचा डाव; किरीट सोमय्यांनी आरोप केलेले काहीजण सरकारसोबत, सोमय्या गप्प का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.