सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात अवैध डान्सबार आणि मुंबई-कल्याण मटका बाजार राजरोसपणे सुरु आहे. पाहूणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना याबद्दल कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसत नाही. पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने आणि पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडून कारवाया होत नसल्याने या संबंधितांच्या कर्तव्यावर आता पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे वाटोळे होण्यास कारणीभूत ठरणारे डान्सबार आणि मटका बंद होत नसल्याने सुज्ञ नागरिकांमधून ‘खाकी’ अन् ‘खादी’वर्दीच्या विरोधात पुन्हा संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
सोलापूर शहर तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालविले जात आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी हे बेकायदा डान्सबार बंद झाले होते. मटकादेखील काही दिवस बंद होता. मात्र, बेकायदा डान्सबारमधील छमछम पुन्हा सुरु झाली आहे. ऑर्केस्ट्राबारच्या आडून नियम पायदळी तुडवत चालकांनी डान्सबार सुरु ठेवलेत. पहाटे पाचपर्यंत डान्सबारमध्ये नंगानाच सुरु आहे.
तसेच मुंबई-कल्याण मटका बाजारदेखील तेजीत चालू आहे. गल्लीबोळातील टपऱ्यांपासून ते हायप्रोफाईल जागेतील ऑफिसमधून मटका चालू आहे.
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सरला तरीही...
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या डान्सबार तसेच मटका जुगारप्रकरणी निश्चितपणाने कारवाई करू, कोणत्याही परिस्थितीत डान्सबार चालू देणार नाही. गणेश उत्सवानंतर कारवाईची मोहीम राबवू असे छातीठोकपणे सांगणाऱ्या पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे ते शब्द हवेत विरल्याचे जाणवत आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव संपला तरी पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा डान्सबार आणि मटक जुगार यांचा बिमोड होण्यासाठी कारवाया होत नाहीत.
पोलिस आयुक्तांच्या ‘मौना’त दडलंय काय?
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमधील बेकायदा डान्सबार आणि मटका जुगारप्रकरणी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची भूमिका समजत नाही. कारवाई संदर्भात विचारल्यास करूया.. बघूया...आकडेवारीच देतो...अशीच उत्तरे त्यांच्याकडून मिळतात.शिवाय अनेकवेळा कारवाईसंदर्भात विचारल्यानंतर ते ‘मौन’ बाळगतात. त्यांच्या ‘मौना’त डान्सबार आणि मटका चालू ठेवणे हेच उत्तर दडल्याची अनुभूती आता सोलापूरकरांना येत आहे.
नव्यांची शिफारस फेटाळली पण जुन्यांचे काय?
सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात नव्याने डान्सबार चालू करण्यासाठी काहीजणांनी परवानगी मागितली होती, या परवानगीसाठी आम्ही शिफारस दिली नाही, डान्सबार नको आहेत, असे भूमिका पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी मांडली होती. नवे डान्सबार चालू करण्याला त्यांनी परवागनी दिली नाही.ठीक आहे. पण जुन्या ऑर्केस्ट्राबारच्या आडून बिनधास्तपणे अन् बिनदिक्कतपणे डान्सबार चालू आहेत त्याचे काय?
विखे-पाटलांचे आश्वासन ‘हवे’त, पाटलांचे काय?
सोलापूरातील बेकायदा डान्सबार कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही, असे त्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले होते. तथापि, त्यांचे हे आश्वासन ‘हवे’तच विरले. तद्नंतरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची डान्सबारबद्दलची भूमिकादेखील सकारात्मकच असल्याचे जाणवत आहे, अशा प्रतिक्रिया सोलापूरकर व्यक्त करीत आहेत. सोलापूरच्या डान्सबारसंदर्भात पालकमंत्री पाटील यांना विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.