Solapur News : सोलापुरात फिरताहेत धोकादायक सिटी बस

परिवहन विभागाची अवस्था बिकट; वर्षभरात विभागच भंगारात निघण्याच्या मार्गावर
Dangerous city buses in Solapur transport department scrap buses
Dangerous city buses in Solapur transport department scrap busesSakal
Updated on

सोलापूर : आयुष्यमान संपलेल्या आणि धोकादायक अवस्थेत असलेल्या महापालिका परिवहन विभागाच्या बस शहरातील विविध मार्गावरून फिरत आहेत. जणू शेवटची घटका मोजत असलेला परिवहन विभाग परिस्थिती नाही सुधारल्यास वर्षभरात स्क्रॅपमध्ये निघण्याची स्थिती असल्याचे जाणकरांकडून सांगितले जात आहे.

प्रतिदिन अडीच लाख खर्च आणि एक लाख उत्पन्न अशी अवस्था आर्थिक बाबतीत परिवहनची झाली आहे. मागील नऊ वर्षात परिवहनच्या ताफ्यात एकही नवीन बस आलेली नाही. सिटी बस खात्याची अवस्था गंभीरच आहे.

महापालिका परिवहन उपक्रमात गेल्या नऊ वर्षामध्ये एकही नवीन बसची खरेदी झाली नाही, चेसी क्रॅक प्रकरणामुळे महापालिकेला नवीन योजना मिळू शकत नाही. सध्या मार्गावर धावत असलेल्या बसचे आयुष्यमान संपले आहे.

९५ टक्के कर्मचारी निवृत्त झाले आहेत. नवीन भरती नाही. परिवहन उपक्रम विभागाकडे गेल्या दहा वर्षात पदाधिकारी व प्रशासनाने अक्ष्यम दुर्लक्ष केले. कर भरणाऱ्या नागरिकांना उत्तम प्रवासी सेवा देण्याऐवजी, स्वत:ची झोळी भरून घेण्याकडे परिवहन समिती पदाधिकारी व सदस्यांनी अधिक लक्ष दिले.

त्याचे पडसाद आज प्रखरतेने दिसून येत आहेत. एकेकाळी नफातून मिळालेल्या रक्कमेची एक कोटी रुपयांची ठेव बँकेत ठेवणारा परिवहन विभागावर आज ३५ कोटी रुपयांच्या देण्याचा बोजा आहे.

कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, अशोक लेलॅंडच्या चेसी क्रॅक बसवर होणारा कोट्यवधींचा खर्च, मार्गावर धावणाऱ्या आयुष्यमान संपलेल्या २५ बसेस, ४७ फेऱ्या, प्रतिदिन अडीच लाख खर्च एक लाख उत्पन्न अशी अगदी शेवटचा घटका मोजत असलेल्या परिवहन उपक्रमाची अवस्था बनली आहे.

२०१४ मध्ये परिवहन विभागाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी केंद्र शानाच्या योजनेतून अशोक लेलॅंड कंपनीच्या एकूण १५० बस मंजूर झाल्या. त्यातील १०० बस परिवहन विभागात दाखल झाल्या. अवघ्या सहा महिन्यात एक बस जळाली तर ९९ बस दहा वर्षांपासून धूळखात पडून आहेत.

महापालिकेला या बस खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. उलट या योजनेचा लाभ घेतल्याने इतर योजनेचा लाभ देखील महापालिका परिवहन उपक्रमाला घेता येईना. आज घडीला महापालिकेकडे असलेल्या सर्वच बस यांचे आयुष्यमान संपले आहे. आयुष्यमान संपलेल्या बस आज मार्गावर धावणे हे धोकादायकच आहे.

हे तर धोक्याचेच...

एका बसचे आयुष्यमान हे १० वर्ष किंवा सात लाख कि. मी. रनिंग इतकी असते. केंद्र शासनाच्या योजनेतून २०१४ मध्ये बस खरेदी झाली. त्यानंतर एकही बस खरेदी करण्यात आली नाही. या योजनेतील सर्व गाड्या अडगळीत पडल्या आहेत.

त्यामुळे जुन्या गाड्या दुरुस्ती करून प्रवासी सेवा देण्यास सुरवात झाली. सध्या मार्गावर धावणारे बसेस २०१२-२०१३ मधील जुने टाटा कंपनीच्या गाड्या आहेत. नियमानुसार या सर्व गाड्यांचे आयुष्यमान संपलेले आहे. अशा गाड्या रस्त्यावरून फिरविण्याचा धोका आहे.

आकडे बोलतात...

  • परिवहन उपक्रमाकडील एकूण बस : १७४

  • चेसी क्रॅकमुळे अडगळीत पडलेल्या बस : ९९

  • दुरुस्त होण्याच्या स्थितीत नसलेल्या बस : ४५

  • दुरुस्ती खर्च परवडत नसल्याने धूळखात पडलेल्या बस : १०

  • मार्गावर फिरणाऱ्या बस : २०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.