सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे हे विभागीय चौकशीत दोषी आढळले आहेत. कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवार (ता.२८) हा मोटे यांच्या सरव्यवस्थापक पदाच्या कारकिर्दीतील शेवटचा दिवस होता. ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या बातम्या आणि ‘डीसीसी’संदर्भातील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या वृत्तमालिकेचे हे यश मानले जात आहे.
‘डीसीसी’ला नवीन सरव्यवस्थापक मिळणार असून गुरुवारी (ता. ३) किंवा शुक्रवारी (ता.४) नवीन सरव्यवस्थापक रुजू होण्याची शक्यता आहे. नवीन सरव्यवस्थापक बाहेरून येणार की ‘डीसीसी’मधील अधिकाऱ्याला पदोन्नती मिळणार? याबद्दल डीसीसीच्या वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मोटे यांच्या संदर्भात सोलापूर जिल्हा सहकारी बॅंक कर्मचारी संघटनेने तक्रार केली होती. संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष शशिभाऊ शिंदे, सचिव राजेश गवळी यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. या तक्रारीवर चौकशी अधिकारी तथा वर्ग दोनचे अपर विशेष लेखा परीक्षक जे. के. तांबोळी यांनी स्वयंस्पष्ट अभिप्राय व चौकशी अहवाल सादर केला होता. अहवाल असूनदेखील प्रशासक कोथमिरे कार्यवाही करत नसल्याने ‘सकाळ’ने या संदर्भात बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. या अहवालानंतर बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी सरव्यवस्थापक मोटे यांची विभागीय चौकशी (डी.ई.) लावली होती. ही चौकशी करण्यासाठी सहकार विभागातील वर्ग दोनचे निवृत्त अधिकारी एस.आर. कदम यांची नियुक्ती केली होती. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात मोटे यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
मोटे यांच्यावर ठेवण्यात आलेला ठपका
सरव्यवस्थापक मोटे यांची शैक्षणिक पात्रता कोणतीही मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून पूर्ण झाली आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या डिग्रीमुळे वादग्रस्त ठरलेल्या या विद्यापीठातून मोटे यांनी टेकक्विक हा स्थापत्य अभियांत्रिकीचा कोर्स पूर्ण केला आहे. बॅंकेत सुरवातीला अभियंता म्हणून व नंतर बॅंकेचे सरव्यवस्थापक म्हणून मिळवलेली नोकरी, बार्शी तालुक्यातील आर्यन शुगरमध्ये बॅंकेच्या कर्जदार व थकबाकीदारांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या मदत होईल या पद्धतीने केलेले कामकाज, जिल्हा बॅंकेतील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिल्याने ही चौकशी करण्यात आली आहे.
याप्रकरणी मोटे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्यात आली आहे. विभागीय चौकशीचा अहवाल आल्यावर कारवाईपूर्वीच त्यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली. नवीन सरव्यवस्थापक लवकरच रुजू होतील. ‘डीसीसी’मध्ये सरव्यवस्थापक मोटे यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
- शैलेश कोथमिरे, प्रशासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.