'आवड असेल तर सवड मिळतेच' ही म्हण काही उगीच प्रचलित नाही झाली. याचा प्रत्यय माढ्यातील मनोज भांगे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतल्यानंतर येतो.
माढा (सोलापूर) : वडिलांच्या आजारपणामुळे कमी वयातच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आली... महाविद्यालयीन शिक्षण घेतच उदरनिर्वाहासाठी खानावळ चालवण्यास आईला मदत करत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून क्लार्कपदाची नोकरी पदरात पाडून घेतली... यादरम्यान दिग्दर्शन व पटकथा लेखनाचा स्वतःचा छंद जोपासण्याची कसरत करत दोन लघुपटांचे (Short Film)) दिग्दर्शन व पटकथा लेखन केले... या लघुपटांना पस्तीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत... "आवड असेल तर सवड मिळतेच' ही म्हण काही उगीच प्रचलित नाही झाली. याचा प्रत्यय माढ्यातील मनोज भांगे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतल्यानंतर येतो.
मनोज भांगे यांनी चित्रपट क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी व गावालाही कोणताही गंध नसताना शून्यातून आपल्या कारकिर्दीला सुरवात करत मिळवलेले दमदार यश सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. यशस्वी होण्यासाठी व एखाद्या क्षेत्रात अपयश येऊनही आयुष्य स्थिरस्थावर करण्यासाठी करिअरमध्ये दोन प्लॅन आवश्यक असल्याचे मनोज भांगे यांच्या उदाहरणावरून दिसून येते.
माढ्यातील मनोज हरिभाऊ भांगे हे आठवीत असतानाच वडिलांचा मोठा अपघात झाला आणि उत्पन्नाचे सगळेच मार्ग बंद झाले. उदरनिर्वाहासाठी खानावळ (मेस) चालवण्यास आई विमल यांना मदत करत स्वतःच्या अंगावर मोठी जबाबदारी घेतली. आईच्या साथीने ही कौटुंबिक जबाबदारी पार पाडतच शालेय शिक्षण घेतले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही वाचनाच्या आवडीचं ध्यासात रूपांतर करत कथा, कविता, नाटक लिहू लागले. मीर तकी मीर ते गुलजारपर्यंतची कविता - शायरी आणि सॉक्रेटिस ते पानसरे, इतिहास घडविणारी माणसे यांच्या परिचयाने त्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता आली. पदवीचे शिक्षण झाले तेव्हा जागतिक सिनेमा कळू लागला. डी सिकाचा बायसिकल थिव्ह्ज, सत्यजित रे यांचा पाथेर पांचाली बघून एक वेगळी वाट खुणावू लागली. नाटक, दिग्दर्शन ते सिनेमा दिग्दर्शन असा प्रवास सुरू झाला. त्यासाठी चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं त्यांना गरजेचं होतं. परंतु चित्रपटासंबंधी महागडे कोर्स करण्याची ऐपत नव्हती, म्हणून एकलव्याचा मार्ग पत्करला. देशभरातले प्रादेशिक सिनेमे, जगभरातले प्रभावशाली सिनेमे आणि सोबतीला पुस्तके असा प्रवास सुरू झाला. एकीकडे आर्थिक परिस्थिती बिघडत होती. त्यामुळे ती सावरणे गरजेचे होते. सहा- सात महिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि कृषी विभागात क्लर्क या पदावर रुजू झाले. अर्थार्जनाचा प्रश्न जेमतेम सुटल्याने आता ध्येयाच्या दिशेने धावण्याचा वेग वाढविला. "अर्धांगवायू झालेला बाप आणि त्याला वाचविण्याची मुलाची धडपड' असे कथानक घेऊन "लव्हाळ' नावाचा पहिला लघुपट केला. पहिल्याच लघुपटाने मनोज यांच्या संघर्षाचे चीज केले.
मुंबईतील नामांकित एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देशभरातून आलेल्या शेकडो फिल्ममधून "लव्हाळ'साठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. आणि मग "लव्हाळ'ने कधी मागे वळून पाहिलेच नाही. दिल्ली, राजस्थान, कोलकता, हैदराबाद, अमेरिका आदी देश- विदेशातले तब्बल 35 हून पुरस्कार "लव्हाळ'ला प्राप्त झाले. आत्मविश्वास उंचावल्याने नंतर "युफोरिया' हा दुसरा लघुपट केला. त्याचे चित्रीकरण कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात झाले. या लघुपटाची निवड नायजेरिया, इंग्लंड आदी ठिकाणी नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये झाली आहे. आता आदिवासी समाजावर आधारित "बेलोसा' या लघुपटाचे शूटिंग पूर्ण झाला. लवकरच तो चित्रपट महोत्सवांमध्ये बघायला मिळणार आहे. यानंतर मात्र मोठी उडी घेत जागतिक स्तरावर नाव होईल असा मोठा चित्रपट बनवण्यासाठी मनोज यांनी प्रयत्नही चालू केले आहेत.
खरेतर मनोज जिथे लहानाचा मोठा झाला, वाढला, शिकला त्या माढ्यामध्ये सिनेमा मुळातच रुजलेला नाही; परंतु चौकटबद्ध काहीतरी करण्यापेक्षा क्रिएटिव्ह करू इच्छिणारे, नवनिर्मिती करू इच्छिणाऱ्यांसाठी हे क्षेत्र म्हणजे खूप मोठे चॅलेंज आहे. उत्तम काम केलं तर आपली कलाकृती जगभर पोचू शकते आणि त्यात चांगलं करिअरही घडू शकतं. सिनेमा हे माध्यम खूप प्रभावशाली आहे. केवळ पैसा आणि ग्लॅमर याचा आव आणणाऱ्यांसाठी हा क्षेत्र मुळीच नाही. सतत नवनिर्मितीचा ध्यास, अविरत कष्ट आणि अफाट संयम या गोष्टींची नितांत गरज या क्षेत्रासाठी आहे.
मनोजने प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत मोठं यश मिळवताना उदरनिर्वाहासाठी "प्लॅन ए' अमलात आणत नोकरीसाठी अभ्यास केला तर स्वतःच्या छंदासाठी वेळ देत "प्लॅन बी' साकारला. आयुष्यात अनेकदा तडजोड अटळ असते. पण अशा तडोजोडीला तडा न जाऊ देता करिअरला दोन प्लॅनची जोड दिल्यास पश्चात्तापाची वेळ न येता यशाचा मार्ग सुकर होतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.