महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी सेनेचा शाखा अध्यक्ष ते पक्षाचा नेता असा धोत्रे यांचा प्रवास आहे.
राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे हे 1992 साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता. श्री. धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्या वेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्या वेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला होता. सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या वाढीत श्री. धोत्रे यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा संघटक, शाडो सहकारमंत्री, प्रदेश सरचिटणीस अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर त्यांना पक्षात नेतेपद देण्यात आले आहे. सोमवारी मुंबईत कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दिलीप धोत्रे यांना राज ठाकरे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन सन्मान केला. या वेळी पक्षाचे मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, सरचिटणीस संतोष नागरगोजे आदी उपस्थित होते.
कोरोना काळात मागील दीड वर्षापासून श्री. धोत्रे यांनी अनेक गोरगरीब व मजुरांना अन्नाधान्य, कपडे मोफत देऊन मोठी मदत केली आहे. अडचणीच्या काळात अनेकांना आर्थिक मदत दिली. कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटल देखील सुरू केले. त्याद्वारे रुग्णांवर माफक दरात उपचार केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्यांना पक्षात मोठे स्थान दिले आहे. त्यांच्या निवडीनंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.