सोलापूर लोकसभेच्या सलग दोन पराभवांनंतर सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवेढ्याकडे असलेले लक्ष कमी केल्यामुळे तालुक्यात कॉंग्रेसला मरगळ आली होती.
मंगळवेढा (सोलापूर) : सोलापूर लोकसभेच्या सलग दोन पराभवांनंतर सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मंगळवेढ्याकडे (Mangalwedha) असलेले लक्ष कमी केल्यामुळे तालुक्यात कॉंग्रेसला (Congress) मरगळ आली होती. मात्र स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील (Pratapsinh Mohite-Patil) यांच्या राजकीय वाटचालीमध्ये जनसेवा संघटनेच्या (Janseva Sanghatna) माध्यमातून योगदान दिलेल्या मंगळवेढ्यातील जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील (Dhawalsinh Mohite-Patil) यांनी कोमात गेलेल्या कॉंग्रेस पक्षाला तालुक्यात आणलेली ऊर्जितावस्था पक्षासाठी आगामी काळासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.
सोलापूर लोकसभेच्या सलग दोन पराभवांनंतर सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवेढ्याकडे असलेले लक्ष कमी केल्यामुळे तालुक्यात कॉंग्रेसला मरगळ आली होती. अशातच डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हाध्यक्षचा पदभार घेतल्यानंतर सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मंगळवेढ्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा दिला.
जिल्ह्यात मोहिते-पाटील घराण्याचा अनेकांशी राजकीय संबंध आला आहे. पदभारानंतर नुकताच डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवेढा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या बरोबरीने काम केलेले स्व. भालकेंचे समर्थक उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, दादा टाकणे, मारुती वाकडे, भीमराव मोरे, पांडुरंग जावळे, विश्वनाथ शिंदे, प्रशांत साळे, भीमराव कांबळे, राजू पाटील, आप्पासाहेब माने या सहकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच ऍड. नंदकुमार पवार, संदीप फडतरे, दिलीप जाधव, राजाराम सूर्यवंशी, मुरलीधर घुले, नाथा ऐवळे, राजाभाऊ चेळेकर, फिरोज मुलाणी यांच्या बरोबरीने कॉंग्रेसची विस्कटलेली मोट बांधण्यात यश मिळवले. बिबट्याची शिकार करून चर्चेत आलेले डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची शिकार करणार का, याची देखील चर्चा यानिमित्त होऊ लागली आहे.
सध्या भालके गटातील अनेकांनी कॉंग्रेसच्या नेत्यांशी सलगी वाढवलेली आहे. शहरात 17 पैकी सात नगरसेवक कॉंग्रेसचे आहेत. पक्षीय बलाबलमध्ये आघाडीवर असल्यामुळे या जागा पुढे टिकवणे हे कॉंग्रेससाठी आव्हान असले तरी, त्या दृष्टीने कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जुळणी सुरू केली आहे. त्यामध्ये सध्या राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या दोन गटांतील कोण हाताला लागते का, याची देखील चाचपणी चालू केली. त्यामुळे मरगळ आलेल्या कॉंग्रेसला धवलसिंह यांनी ऊर्जितावस्था आणून दिली आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते आता वेगाने हालचाली करू लागले. पंचायत समितीमध्ये कॉंग्रेसचे तीन सदस्य आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जीवनात योगदान देणाऱ्यांना संधी देण्याचे संकेत मोहिते-पाटील यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील पक्षाची धुरा नव्या कार्यकर्त्यांवर सोपवली जाणार असल्यामुळे या पक्षाला भविष्यात अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.