सोलापूर : शहरातील विकास कामांसाठी नगरसेवकांना (Corporators) दरवर्षी भांडवली निधी (Capital funds) दिला जातो. मात्र, कोरोना काळात महापालिकेच्या (Solapur Municipal Corporation) उत्पन्नात मोठी घट झाल्याने नगरसेवकांच्या भांडवली निधीला कात्री लावण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार शहरी भागातील नगरसेवकांना प्रत्येकी 25 लाख तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांना प्रत्येकी 35 लाखांचा भांडवली निधी दिला जाणार आहे. (Due to low income, the capital fund of the corporators was reduced)
महापालिकेच्या क्षेत्रात एकूण 102 नगरसेवक आहेत. तर स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच आहे. या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या तिजोरीतून भांडवली निधी दिला जात आहे. शहर हद्दीतील नगरसेवकांना प्रत्येकी पन्नास लाखांचा तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांना प्रत्येकी 60 लाख रुपयांचा भांडवली निधी देण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्तांनी घेतला होता. शहर हद्दीत 39 तर हद्दवाढ भागात एकूण 62 नगरसेवक आहेत. महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित उत्पन्न जमा होत नसल्याने मक्तेदारांच्या बिलांचा बोजा महापालिकेच्या तिजोरीवर वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त पी. शिवशंकर यांनी नगरसेवकांच्या भांडवली निधीला कात्री लावत तो निधी निम्म्याने कमी केला आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने भांडवली निधी न देण्यावर आयुक्त ठाम होते. परंतु, सर्वच नगरसेवकांनी आगामी महापालिका निवडणुकीचे कारण पुढे करत भांडवली निधीसाठी आग्रह धरला. त्यानंतर आयुक्तांनी एक पाऊल मागे घेत भांडवली निधी कमी करून काही प्रमाणात निधी देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या तिजोरीत अजूनही अपेक्षेप्रमाणे कराची रक्कम जमा होत नाही. त्यामुळे भांडवली कामांचे पैसे मक्तेदारांना उशिरानेच मिळतील, अशी परिस्थिती कायम आहे. तत्पूर्वी, नगरसेवकांना भांडवली निधी देण्याचा निर्णय घेताना आयुक्तांनी स्वीकृत नगरसेवकांचा उल्लेख त्यामध्ये केलेला नाही. त्यामुळे त्या पाच नगरसेवकांना भांडवली निधीचा एक रुपयाही मिळणार नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
महापालिकेची स्थिती...
उत्पन्नाचे उद्दिष्ट : 320 कोटी
15 मेपर्यंत मिळाले : 2.87 कोटी
एकूण नगरसेवक : 102
शहरातील नगरसेवकांना भांडवल निधी : प्रत्येकी 25 लाख
हद्दवाढ नगरसेवकांना भांडवल निधी : प्रत्येकी 35 लाख
दीड महिन्यात 2.87 कोटींचे उत्पन्न
कोरोना काळात काही नगरसेवकांनी त्यांचा भांडवल निधी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अशा विविध कामांसाठी खर्च करण्यात यावा, असे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. परंतू, महापालिकेच्या तिजोरीत दमडीही नसल्याने त्यावर अजूनही प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. महापालिकेच्या तिजोरीत दरमहा सुमारे 40 ते 42 कोटींचे उत्पन्न जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, एप्रिल 2021 मध्ये महापालिकेला केवळ पावणेतीन कोटी रुपये तर 15 मेपर्यंत अवघे 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर मागच्या वर्षी महापालिकेला 317.13 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट असतानाही महापालिकेला अवघे 144.94 कोटींचेच उत्पन्न मिळाले. आता कोरोनाच्या संकटात कडक संचारबंदी असल्याने दुकाने उघडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर दुसरीकडे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे कर वसूल करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
20 मे रोजी सर्वसाधारण सभा ऑनलाइन
कोरोनामुळे 102 नगरसेवकांची ऑफलाइन सर्वसाधारण सभा घेणे अशक्य आहे. त्यामुळे 20 मे रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यासंदर्भात महापौर श्रीकांचना यन्नम यांनी नगरसचिवांना पत्र दिले आहे. या सभेमध्ये मागील काही दिवसांतील प्रलंबित विषयासह बजेट मीटिंगबाबत प्राथमिक चर्चा होईल. त्यानंतर 2021-22 आर्थिक वर्षातील बजेट सभा कधीपर्यंत होणार यावर निर्णय होईल, असे नगरसचिव कार्यालयाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.