सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला अठरा वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या १८ वर्षांत उच्चशिक्षण क्षेत्रात विद्यापीठाने मोठी भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि पायाभूत सोयी-सुविधा देण्यात विद्यापीठ यशस्वी झाले आहे.
विद्यापीठ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांची संख्या दुपटीने वाढली असून, गरज ओळखून १५० हून अधिक ‘कौशल्य विकास’ अभ्यासक्रम (स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस) सुरू झाले. विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत असल्याची दखल जागतिक पातळीवर ‘ऑक्सफर्ड लीडर्स समिट-यूके २०२२’ साठी घेण्यात आली आहे.
एकाच जिल्ह्यापुरते विद्यापीठ म्हणून सोलापूर विद्यापीठाची देशभर ओळख आहे. १ ऑगस्ट २००४ रोजी विद्यापीठाची स्थापना झाली. १८ वर्षांत विद्यापीठाला चार कुलगुरू मिळाले असून, सध्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून डॉ. मृणालिनी फडणवीस कामकाज पाहत आहेत. प्रारंभी विद्यापीठात चार संकुले होती, आता १२ संकुले आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमधून दरवर्षी जवळपास दोन हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. विद्याशाखांतर्गत नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची सोय विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याने परराज्यातील, परदेशातील मुले याठिकाणी प्रवेश घेत आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून विद्यापीठाला दहा-बारा वर्षांत अपेक्षित निधी मिळाला नाही. २०१६ नंतर विद्यापीठाने रिक्त पदांसह नवीन पदभरतीची शासनाकडे वेळोवेळी मागणी केली. मात्र, त्याला मान्यता मिळाली नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर विद्यापीठाचा गाडा सुरू असतानाही विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भव्य पुतळ्याची उभारणी
विद्यापीठाच्या नूतन इमारतीसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा भव्य पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारकडून १४.५३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हाती शिवपिंड घेतलेला अहिल्यादेवींचा पुतळा उभारला जात असून, त्याची निविदा अंतिम म्हणून मक्तेदारही नियुक्त करण्यात आला आहे. परिसर सुशोभीकरण करताना तेथे ॲम्पिथियटर उभारले जाणार आहे. अहिल्यादेवींच्या चरित्रग्रंथ त्याठिकाणी असणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्याकडून अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे काम चालू आहे.
कॉन्स्टिट्यूट महाविद्यालयाची नवी संकल्पना
विद्यापीठात यंदा कॉन्स्टिट्यूट महाविद्यालयाची नवी संकल्पना राबविण्यात आली आहे. बारावीनंतर ‘पदवीचे घटक महाविद्यालय’ विद्यापीठात सुरू झाले आहे. त्याठिकाणी बी.ए. लिबरल, बी.कॉम. लिबरल, बी.एस्सी. लिबरलचे प्रथम वर्षाचे प्रवेश देणे सुरू आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना विद्याशाखा बदलाअंतर्गत वेगवेगळे विषय शिकण्याची ही सुवर्णसंधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे.
विद्यापीठ दृष्टिक्षेपात...
संलग्नित महाविद्यालये : ११०
विद्यार्थी संख्या : १.२० लाख
अभ्यासक्रमांची संख्या : ५५
‘कौशल्य विकास’ अभ्यासक्रम : १५०
विद्यापीठ संकुल : ११
विद्यापीठाकडील जमीन : ५१७ एकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.