सोलापूर ः हिप्परगा (एकरुख) तलावाचे सौंदर्य अबाधित राखून तलावाभोवतीचा परिसर सुशोभित करावा, तसेच पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (सोमवारी) तलाव परिसरात बैठक घेण्यात आली. यामध्ये विविध विकास कामांबाबत चर्चा करून तातडीने सुशोभिकरणाचे काम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले. या कामासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्याचे ठरले.
सोलापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या हिप्परगा तलावाचे आकर्षण पर्यटकांबरोबरच पक्षी निरीक्षकांनाही आहे. या तलाव परिसराचे सुशोभिकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी पाऊल उचलले असून संबंधित यंत्रणांकडे त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. याचा आढावा तसेच जबाबदारीचे वाटप करण्याच्या दृष्टीने बैठक झाली. त्यात जलसंपदा विभागाच्या ताब्यातील जागेच्या स्वच्छतेची जबाबदारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे, परिसराची मोजणी करून नकाशे तयार करण्यासाठी जिल्हा भूमी अभिलेख विभागाकडे पाठपुरावा, वृक्षारोपणाची जबाबदारी वनीकरण व फॉरेस्ट यांच्याकडे सोपविण्यात आली. या परिसराचा विकासाचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष व पक्षीप्रेमी डॉ. व्यंकटेश मेतन यांनी जबाबदारी स्वीकारली. परिसर स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याची भूमिका महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी स्वीकारली. हिप्परगा तलाव सुशोभिकरणाच्या प्रारुप विकास आराखड्याचे सादरीकरण पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात येणार आहे.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक धिरज साळे, "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, कार्यकारी अभियंता रमेश वाडकर, सामाजिक वनीकरणचे विभागीय वनअधिकारी सुवर्णा झोळ-माने, सहायक वनसंरक्षक इर्शाद शेख, प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, निवृत्त उपअभियंता पी. एस. कांबळे, शाखा अभियंता शिरीष जाधव आदी उपस्थित होते.
'सकाळ'चा पाठपुरावा
सोलापूर शहरालगत असलेल्या हिप्परगा तलाव परिसराचे सुशोभिकरण करावे त्यातून पर्यटनात वाढ व्हावी, यासाठी "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. या संदर्भात प्रशासनाने दखल घेत नियोजन सुरु केले आहे. पालकमंत्री श्री. भरणे यांनी या योजनेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची "सकाळ'ची भूमिका आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.