"दक्षिण'मधील गावोगावी सुरू आहे "पंच' होण्यासाठी सामना ! मुस्ती, भंडारकवठे, होटगी अन्‌ कुंभारीत चुरस

South Solapur
South Solapur
Updated on

दक्षिण सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 52 गावांत निवडणुका घोषित झाल्या. त्यापैकी बोरामणी, संगदरी, तीर्थ, दिंडूर, लिंबीचिंचोळी व बाळगी या सहा गावांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 46 गावांत 835 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये मुस्ती, भंडारकवठे, होटगी अन्‌ कुंभारीत अटीतटीची लढत होत असल्याने तालुक्‍यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

कोरोनामुळे यंदा ग्रामपंचायत निवडणूक साध्या पद्धतीने होईल असे वाटत असतानाच, उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांनी भाऊगर्दी केल्याने गावोगावी "पंच' होण्याचा सामना रंगला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण 569 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने सहा ग्रामपंचायतींसह 139 सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. बोरामणी, संगदरी, तीर्थ, दिंडूर, लिंबीचिंचोळी व बाळगी या ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या. आता 46 गावांत 835 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या गावात निवडणूक प्रचार रंगतदार झाला असून, उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन आपल्यालाच मतदान करण्याचे अभिवचन मतदारांकडून घेतले आहे. मतदारांनीही प्रत्येकाला "तुम्हालाच मतदान करणार' असे अभिवचन दिले असले तरी प्रत्यक्षात निकालानंतरच चित्र स्पट होणार आहे. अनेक गावांत आणाभाका अन्‌ पैजाही लावल्या गेल्या आहेत. 

या वेळी मोबाईलच्या वापरामुळे प्रचार सोपा झाला असला तरी त्याचा काही प्रमाणात दुरुपयोग होताना दिसत आहे. अनेक गावात तरुणांचा वाढता सहभाग यंदा प्रथमच दिसत असल्याने गावगाड्याला एक वेगळी दिशा मिळण्याची आशा आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मोठ्या गावांच्या यादीतील भंडारकवठे, कुंभारी, मुस्ती, होटगी येथील निवडणूक तालुक्‍यासह जिल्ह्याचे लक्ष वेधणारी ठरणार आहे. 

कुस्तीगीरांचे गाव अशी ख्याती असलेले बोरामणी गाव बिनविरोध झाल्याने येथे निवडणूक आखाड्यातील कुस्ती नाही. नेहमी या गावातील निवडणूक रंगतदार व अटीतटीची होत असते; परंतु ग्रामस्थांनी या वेळी एक चांगला पायंडा पाडत ग्रामपंचायत बिनविरोध केल्याने तालुक्‍यासह जिल्ह्यातून ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. 

मुस्ती येथील निवडणूक आखाड्यातील कुस्ती यंदा रंगतदार होत आहे. येथे जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे माजी सभापती भीमाशंकर जमादार व कल्याणराव पाटील यांनी एकत्रित येत कळके गटासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. भाजपचे सुनील कळके यांनी हे आव्हान स्वीकारत दोन हात करण्याची तयारी केली आहे. येथील प्रभाग दोनमध्ये भीमाशकंर बिराजदार यांचे पुत्र धनराज बिराजदार यांचा सामना प्रवीण कळके यांच्याशी होत आहे, तर प्रभाग चारमध्ये कल्याणराव पाटील यांचे पुत्र नागराज पाटील यांचा सामना पॅनेलप्रमुख सुनील कळके यांच्याशी होत आहे. या दोन्ही लढतींकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

होटगी ग्रामपंचायतीत सत्तेसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. यामुळे या निवडणुकीकडे तालुक्‍यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाच प्रभागांतून 15 सदस्य निवडले जाणार आहेत. भाजपचे रामप्पा चिवडशेट्टी यांचे समर्थ ग्रामविकास पॅनेल व हरीश पाटील यांच्या ग्रामविकास महाविकास आघाडी पॅनेलमध्ये दुरंगी लढत आहे. होटगी-सावतखेड ग्रुप ग्रामपंचायतीवर सध्या भाजपचे चिवडशेट्टी यांची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत होटगीकरांनी सत्ता दिल्यानंतर "एकच ध्यास गावचा विकास' असे म्हणत त्यांनी पाच वर्षे एकहाती कारभार केला. अनेक विकासकामे केली. या बळावरच पुन्हा एकदा ते स्वतंत्र पॅनेल उभा करून मतदारांसमोर जात आहेत. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील हे माजी आमदार कै. गुरुनाथ पाटील यांचे चिंरजीव म्हणून तालुक्‍यात परिचित आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक असून कॉंग्रेसच्या माध्यमातून व पंचायत समितीचे उपसभापती असताना केलेल्या कामांच्या जोरावर ते आपली ताकद अजमावत आहेत. 

या निवडणुकीत कॉंग्रेसचे हरीश पाटील व माजी आमदार दिलीप माने यांचा गट एकत्र आला आहे. यामुळे पाटील यांचे बळ वाढले आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस व माने समर्थक एकत्र आल्याने या निवडणुकीला रंग भरला आहे. चिवडशेट्टी गटाला शह देण्यासाठी ग्रामविकास महाआघाडीची स्थापना करून पाटील हे सत्ता परिवर्तनासाठी प्रयत्न करीत आहेत. 

एकंदर होटगी ग्रामपंचायत निवडणूक चिवडशेट्टी आणि पाटील यांच्या गटात होत असून, होटगीकर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्या गटाला संधी देणार? या लक्षवेधी दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार? चिवडशेट्टी गटाला सत्तेपासून दूर सारण्यासाठी पाटील यांच्या महाविकास आघाडी गटाला यश येईल का? याचीच चर्चा सध्या गावात व तालुक्‍यात होत आहे. 

भंडारकवठेत 17 सदस्यांच्या निवडीसाठी मतदान होत आहे. येथे बाजार समितीचे संचालक वसंत पाटील व माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील यांचे समर्थ ग्रामविकास पॅनेल व सोसायटीचे माजी चेअरमन भीमाशंकर बबलेश्‍वर यांचे पीर महासिद्ध ग्रामविकास पॅनेल यामधे रंगतदार लढत होत आहे. श्री. बबलेश्‍वर यांना विद्यमान पंचायत समिती सदस्य महादेव कमळे, भाजपचे यतिन शहा, सोसायटीचे अध्यक्ष गोपाळ जंगलगी व प्रा. व्ही. के. पाटील यांची साथ आहे. माजी सरपंच मीनाक्षी जंगलगी यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील राजश्री जंगलगी यांनी आव्हान उभे केले आहे. 

कुंभारीत माजी उपसभापती व विद्यमान उपसरपंच अप्पासाहेब बिराजदार यांच्या विरोधात माजी सभापती ताराबाई पाटील यांचे पती शिरीष पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. येथे तीन प्रभागांत भावकीत सामना रंगला आहे. 17 सदस्यांच्या निवडीसाठी तुल्यबळ लढतीत दुरंगी सामना होत आहे. येथील निवडणुकीकडे तालुक्‍याचे लक्ष आहे. शिरीष पाटील यांनी पुतणे सूरज पाटील यांना प्रभाग चारमधून रिंगणात उतरवले आहे. तर श्री. बिराजदार प्रभाग तीनमधून रिंगणात आहेत. 

कुरघोट ग्रामपंचायतीची सत्ता सरपंच बन्ने यांच्याकडे आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते सत्तेत आहेत. येथे आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. 
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी सरपंच बन्ने यांच्याविरोधात पॅनेल उभे केले आहे. 

टाकळी ग्रामपंचायतीच्या सत्तेसाठी विद्यमान सरपंच सुशीला ख्यामगोंडे यांच्या विरोधात त्यांचे जावई सिद्धाराम घोडके यांनी आव्हान उभे केले आहे. गेल्या निवडणुकीत एकत्रित सत्तेत आलेल्या या दोघांच्या नात्यांमध्ये यावेळी फूट पडली आहे. यामुळे सत्तेसाठी सासू विरुद्ध जावई आमने-सामने उभे ठाकले आहेत. 

ठळक... 

  • कुंभारीत 17 सदस्यांसाठी माजी उपसभापती व विद्यमान उपसरपंच अप्पासाहेब बिराजदार यांच्या विरोधात माजी सभापती ताराबाई पाटील यांचे पती शिरीष पाटील यांचे आव्हान 
  • भंडारकवठेत 17 सदस्य निवडीसाठी बाजार समितीचे संचालक वसंत पाटील व सोसायटीचे माजी अध्यक्ष भीमाशंकर बबलेश्‍वर यांच्यात तुल्यबळ लढत 
  • होटगीत भाजप व कॉंग्रेस तालुकाध्यक्षामध्ये सत्तेसाठी सामना 
  • मुस्तीमध्ये माजी सभापती भीमाशंकर जमादार व कल्याणराव पाटील यांचे पुत्र रिंगणात 
  • मुस्तीत भाजपचे सुनील कळके व कॉंग्रेसचे भीमाशंकर जमादार अन्‌ कल्याणराव पाटील यांच्या गटात तुल्यबळ लढत 
  • कुरघोट ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विद्यमान सरपंच बनसिद्ध बन्ने विरुद्ध शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांच्यात सामना 
  • टाकळीत सासू विरुद्ध जावई आमने-सामने 

सख्खे चुलत भाऊ आमने-सामने 
होटगीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये इंद्रजित लांडगे व त्यांचे चुलत बंधू म्हाळाप्पा लांडगे यांच्यात लढत होत आहे. इंद्रजित लांडगे हे भाजपचे चिवडशेट्टी यांचे समर्थक होते; पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. आता ते कॉंग्रेसचे हरीश पाटील यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने त्यांचे चुलत भाऊ म्हाळप्पा लांडगे यास उतरविले आहे. या दोन भावांमधील लढतीची खमंग चर्चा गावात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.