Soybean Explorer: सोयाबीनच्या वीस किलो बियाणांतून १३ क्विंटल उत्पादन

13 quintal yield from 20 kg seeds: साकत येथील भरघोस उत्पादन घेणारे शेतकरी विजयसिंह सपकाळ यांचा शेतकऱ्यांसमोर आदर्श
Soybean Explorer
Soybean Explorer Sakal
Updated on

मळेगाव : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, सुधारित बियाणे, नेटके नियोजन व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भरघोस उत्पादन मिळू शकते, हे बार्शी तालुक्यातील साकत येथील प्रयोगशील शेतकरी विजयसिंह रामभाऊ सपकाळ यांनी दाखवून दिले आहे.

वीस किलो बियाणांतून बारा ते तेरा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेऊन परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा बार्शी तालुका हा आता विक्रमी सोयाबीन उत्पादनासाठी प्रसिद्ध झाला आहे.

विजयसिंह सपकाळ हे दरवर्षी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, अमोल शास्त्री, जवळगे तसेच बार्शी कृषी विभागाचे विनोद जगदाळे यांचे योग्य व अचूक मार्गदर्शन मिळाल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

त्यांनी सोयाबीनची पेरणी करताना बीबीएफ पद्धतीचा वापर केला. यामुळे बियाणांची बचत झाली व खर्चही कमी झाला. बीबीएफ पद्धतीमुळे पिकात पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले. वीस इंचावर पेरणी केल्यामुळे मशागत करणेदेखील सुकर झाले. ट्रॅक्टरद्वारे कोळपणी, ब्लोअरद्वारे फवारणी यांमुळे वाढत्या मजुरीत बचत झाली.

बीबीएफ तंत्रामुळे जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढली. परिणामी कमी पाण्यावर देखील सोयाबीनचे उत्पादन घेणे शक्य झाले. विजयसिंह सपकाळ यांनी वीस किलो सोयाबीनच्या बियाणांतून विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे केव्हीके सोलापूर व बार्शी कृषी विभाग यांच्यामार्फत त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे.

बीबीएफ तंत्रप्रणाली, सुधारित बियाणे, अचूक मार्गदर्शन मिळाले तर कमी पाण्यावर देखील सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेता येते. योग्य वेळी फवारणी, कोळपणी करून रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो. बीबीएफ तंत्रप्रणालीमुळे बियाणांची बचत होते. जमिनीत ओलावा टिकून राहतो व एकरी उत्पादनात वाढ होते.

- विजयसिंह सपकाळ, सोयाबीन उत्पादक शेतकरी, साकत, ता. बार्शी

सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी पेरणीपूर्वी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करावी. खताची योग्य मात्रा द्यावी. बीबीएफ यंत्राने पेरणी करावी. चिकट सापळे, कामगंध सापळे लावावेत. एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे. फवारणीमधून खते द्यावीत.

- विनोद जगदाळे, कृषी सहायक

टोकन पद्धतीने सोयाबीनची लागण केल्यास अधिक उत्पादन घेता येते. विजयसिंह सपकाळ यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत नेहमीच सोयाबीनचे अधिक उत्पादन घेतले आहे. साकत येथील शेतकऱ्यांना केव्हीके सोलापूर यांचे मार्गदर्शन मिळाल्याने साकत परिसरात सोयाबीन उत्पादन वाढले आहे.

- बाबासाहेब हाजगुडे, सोयाबीन उत्पादक शेतकरी, साकत, ता. बार्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.