ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आता ज्वारीच्या पेरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे.
रोपळे बुद्रूक (सोलापूर) : जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील ज्वारीच्या (Jowar) पेरणीसाठी शेतकऱ्यांनी (Farmers) चाढ्यावर मूठ धरली आहे. पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पेरणीला सुरवात केली आहे. दरम्यान, जमिनीच्या प्रकारानुसार ज्वारीच्या वाणाची निवड करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) आता ज्वारीच्या पेरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. रब्बीच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होते.
बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही क्षेत्रावर शेतकरी ज्वारीची पेरणी करतात. कोरडवाहू पेरणीसाठी शेतकरी घरातील बियाणे वापरतात. तर जमिनीच्या प्रकारानुसार ज्वारी पेरणीसाठी विविध सुधारित व संकरित वाण वापरतात. जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा, अक्कलकोट आदी तालुक्यांत ज्यातीचा पेरा तुलनेत जास्त होतो. या भागातील शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन ज्वारीची पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. ज्या भागात पाऊस कमी झाला आहे, अशा भागातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. तर ज्या भागात पाऊस जास्त झाला आहे अशा भागातील शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. ज्वारीची पेरणी पारंपरिक व यांत्रिक या दोन्ही पद्धतीने केली जात आहे. बैलांच्या माध्यमातून ज्वारी पेरणीसाठी एकरी सुमारे बाराशे रुपये तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून ज्वारीची पेरणी करण्यासाठी एकरी सुमारे 800 ते एक हजार रुपये घेतले जातात.
आमच्या भागात ज्वारीच्या पेरणीची तयारी सुरू आहे. पाऊस फारच कमी पडला आहे. पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतरच आम्ही ज्वारीची पेरणी करतो. ज्वारीच्या बीज प्रक्रियेसाठी आम्ही मल्टिप्रायर तंत्राचा वापर करतो. यामुळे ज्वारीचा चारा व ज्वारीच्या उत्पादनात वाढ होते.
- विश्वनाथ देवरमनी, ज्वारी उत्पादक शेतकरी, नागणसूर, ता. अक्कलकोट
आमच्या भागात फारच कमी पाऊस पडला आहे. त्या पावसाच्या ओलाव्याच्या वाफशावरच ज्वारीची पेरणी केली आहे. पुढे अजून पाऊस पडत गेला तर ज्वारीचे पीक चांगले साधेल म्हणून ज्वारीची पेरणी केली.
- कुमार देशमुख, शेतकरी, हतीद, ता. सांगोला
शेतकऱ्यांनी जमिनीच्या प्रकारानुसार ज्वारीच्या वाणाची निवड करावी. बीज प्रक्रिया व दोन ओळीतील अंतर 45 सेमी तर दोन रोपांतील अंतर 15 सेमी ठेवून योग्य ओलीवर पेरणी केली तर कडबा व ज्वारीचे उत्पादन वाढते.
- डॉ. शरद जाधव, विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 400 मिलिमीटर पाऊस पडला आहे. अजून तेवढाच पाऊस पडणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात सरासरी 700 ते 750 मिलिमीटर पाऊस पडत असतो. एवढा पाऊस पडला तर ज्वारीचा पेरा यंदा नक्कीच वाढेल.
- डॉ. विजय अमृतसागर, सहयोगी संशोधन संचालक, कोरडवाहू संशोधन केंद्र, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.