उजनी जलाशयाच्या विस्तीर्ण परिसरात हिवाळ्याची चाहूल लागताच स्थलांतरित परदेशी पक्ष्यांचा वावर वाढू लागला आहे.
केत्तूर (सोलापूर) : उजनी जलाशयाच्या (Ujani Dam) विस्तीर्ण परिसरात हिवाळ्याची चाहूल लागताच स्थलांतरित परदेशी पक्ष्यांचा (Birds) वावर वाढू लागला आहे. काही दिवसापूर्वी उजनीचे खास आकर्षण असणाऱ्या फ्लेमिंगो (Flamingo) अर्थात रोहित पक्ष्याचे आगमन झाले असतानाच आता पट्टकदंब हंसाचेही (Pattakadamb Bird) आगमन झाले आहे. हिमालयाच्या (Himalaya) मान सरोवरातील नितळ पाण्याचे साक्षीदार म्हणून ओळखले जाणारे तसेच तिबेटच्या (Tibet) विविध जलस्थानांवर मूळ वास्तव्याला असणारे पट्टकदंब हंस जिल्ह्यातील वरदायिनी असलेल्या उजनीवर हिवाळी पाहुणे म्हणून येऊन दाखल झाले आहेत. उजनी जलाशयाच्या काठावरील हिरवळीवर हे नजाकतदार हंस दिमाखदार चालीने वावरताना पक्षीप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहेत. उजनी जलाशयातील परिसर विविध पक्ष्यांनी गजबजू लागला आहे. त्यात आता फ्लिमिंगोपाठोपाठ पट्टकदंब हंस या दुर्मिळ आणि देखण्या पक्ष्याची उजनीत भर पडली आहे.
पट्टकदंबाची वैशिष्ट्ये...
पांढरे शुभ्र डोके, त्यावर दोन काळे समांतर पट्ट्या ही या हंसांना ओळखण्याच्या खुणा आहेत. स्थानिक बदकांपेक्षा मोठ्या आकाराचे शरीर असलेल्या या हंसातील चोच गुलाबी आहे व त्यांचे पाय नारंगी- पिवळे असतात. राखी रंगाच्या पंखांवर काळे पट्टे असतात. शेपटीचे मूळ व टोक पांढरेशुभ्र असतात. यांना कादंबहंस या नावानेही ओळखतात. इंग्रजीत बार हेडेड गूज म्हणतात. तीन महिन्यांच्या उजनीवरील वास्तव्यानंतर हे हंस हिवाळा सरतेवेळी पुन्हा हिमालयाकडे कूच करतात. पाण्यातून मुक्त झालेल्या हिरवळीवर हे पक्षी चरत असतानाचे दृश्य मनोहारी वाटते. पहाटेच्या वेळी हे हंस 'अंग... अंग...' असा आवाज करत एकमेकांना साद घालतात व ऐकणाऱ्यांना तो आवाज कर्णमधुर वाटतो.
आणखी जाणून घ्या पट्टकदंबाबत...
हिवाळ्याच्या सुरुवातीला पट्टकदंब भारतात येतात. सैबेरिया, मध्य आशिया, तिबेट, लडाख या पाच हजार फूट उंचीवरील ठिकाणच्या पाणवठ्यांवर त्यांचे प्रजनन होते.
इतर पक्षांच्या तुलनेत 29 हजार फूट उंचीवरून उडण्याची क्षमता या पक्ष्याचे असते.
पाकिस्तान अफगाणिस्तान या देशांमध्ये या पक्ष्यांच्या मोठ्या प्रमाणावर शिकारी होतात. या पक्ष्यांच्या शिकारीवर भारतात मात्र बंदी आहे.
एक विशिष्ट आवाज आणि व्ही आकारात हे पक्षी उडल्यानंतर त्यांच्या कातडीची चमक आकर्षक दिसते. भारतात तमिळनाडूपर्यंत हे पक्षी भ्रमण करतात.
समुद्रसपाटीपासून सर्वात उंच उडणारा पक्षी म्हणून यांची ओळख आहे. हे पक्षी आकाराने 71 ते 76 सेंटीमीटर इतके असतात.
उजनी जलाशयावर धाकट्या, नकट्या, शेंडी बदक, लालसरी, गडवाल, चक्रवाक, धाकटे मराल, तरंग ही बदकेही आवर्जून हजेरी लावतात. दरवर्षी उजनी जलाशय परिसरात अनेक प्रकारच्या परदेशी बदकांचे आगमन होते. त्यापैकी प्रामुख्याने दरवर्षी न चुकता ठरलेल्या वेळेत म्हणजेच हिवाळ्याच्या प्रारंभी पट्टकदंब हंस अनेक छोट्या- मोठ्या थव्यांनी उजनीवर येऊन दाखल झाले आहेत.
नव्वदच्या दशकापर्यंत हे हंस पक्षी उजनी जलाशयासह नीरा व भीमा नदीच्या पात्रात तसेच जिल्ह्यातील अनेक तलावांवर वावरताना दिसून येत होते; मात्र सध्या या नद्यांना प्रदूषणाने ग्रासल्यामुळे या परदेशी पक्ष्यांनी तिकडे पाठ फिरवली आहे. सकाळ व संध्याकाळच्या वेळी चरण्यात दंग असलेले हे हंस पक्षी दुपारच्या वेळी पाण्याच्या काठावरील पाणवनस्पतींच्या आडोशाला विश्रांती घेत असतात. अशा बेसावध वेळी या पक्ष्यांची शिकार होण्याची शक्यता असते.
- डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक
हिवाळ्यासह उन्हाळ्याच्या मध्यापर्यंत उजनी जलाशावर हंगामातील दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्या विविध पक्षी प्रजातींचे जीवनमान प्रदूषित पाण्यामुळे धोक्यात येऊ शकते. काही पक्षी अन्य लहान जलस्रोतांना प्राधान्य देताना दिसून येत आहेत. प्रदूषणाचा पक्ष्यांवरील प्रतिकूल परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे.
- कल्याणराव साळुंके, पक्षीप्रेमी, करमाळा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.