सोलापूर : ‘इंग्रजी’ शाळांमध्ये बोगसगिरी! मान्यता नाही, तरी ९ वर्षे मुलांना प्रवेश; शाळांना नोटीस, अन्‌ आता...

सोलापूर शहरातील तीन शाळांना महापालिका प्रशासनाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून ग्रामीणमधील अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा तपासणीसाठी ‘मिशन सर्च ऑपरेशन’ सुरु झाले आहे. तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्यासंबंधीचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
schools
schoolssakal
Updated on

सोलापूर : शालेय शिक्षण विभागाची मान्यता नाही, शाळा सुरु करण्याचे नाहकरत प्रमाणपत्र व कोणत्या बोर्डाशी संलग्नित आहे, याचे प्रमाणपत्र नसतानाही, काही शाळा विशेषतः: इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर, सोलापूर शहरातील तीन शाळांना महापालिका प्रशासनाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून ग्रामीणमधील अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा तपासणीसाठी ‘मिशन सर्च ऑपरेशन’ सुरु झाले आहे. तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्यासंबंधीचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

राज्यभरात तब्बल आठशे शाळा बोगस असून त्यातील १०० शाळांना टाळे लावण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची मान्यता न घेताच त्या शाळा अनधिकृतपणे सुरु होत्या. अनधिकृत शाळांमध्ये बहुतेक इंग्रजी माध्यमांच्याच शाळा आहेत. पहिल्या टप्प्यात शिक्षण विभागाने राज्य बोर्डाव्यतिरिक्त अन्य बोर्डाशी संलग्नित असलेल्या शाळांची माहिती संकलित केली आहे. आता महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळांची माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, तत्पूर्वी पालकांनी आता मुलांचा प्रवेश घेताना, ती शाळा कोणत्या बोर्डाशी संलग्नित आहे, संबंधित शाळेला शासनाची मान्यता आहे का, शाळा सुरु करताना त्यांनी शिक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे का, याची चौकशी करावी आणि प्रवेश निश्चित करावा, अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, पालकांनी जागरूक राहून माहिती घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचे फॅड वाढल्यानेच बनावट शाळांचा सुळसुळाट सुरु असल्याचे सांगितले जात आहे. पण, मान्यतेविना सुरु असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेशापूर्वी शिक्षण विभागाकडील अधिकृत मान्यताप्राप्त शाळांमध्येच मुलांचा प्रवेश घ्यावा, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील तीन शाळा कारवाईच्या कक्षेत

हिदाय इंग्लिश मीडियम स्कूल (पहिली ते आठवी), इकरा इस्लामिक इंग्लिश मीडियम स्कूल (पहिली ते आठवी), जोडभावी पेठ आणि इकरा इंग्लिश मीडियम स्कूल (पहिली ते पाचवी), नई जिंदगी या शाळांना महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. या शाळांना मान्यता नाही. तरीदेखील त्या शाळा काही वर्षांपासून सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना नोटीस काढून शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे प्रशासनाधिकारी हनुमंत जाधवर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

पालकांनी सतर्क राहून शाळांच्या मान्यतेची करावी खात्री

मान्यता घेताना शाळेसाठी जी जागा निश्चित केलेली आहे, संबंधित जागेत शाळा भरत नाहीत आणि ज्या शाळांना मान्यताच नाही, तरीपण सुरु आहेत, अशा शाळा नवीन शैक्षणिक वर्षात सुरु असणार नाहीत. त्या अनुषंगाने, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तशा शाळांचा शोध घेतला जात आहे. पालकांनीही अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

कारवाईच्या भीतीने ३० शाळांचे प्रस्ताव

शहर-ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना घालण्याचे फॅड वाढल्यानंतर अनेकांनी स्वयंअर्थसहायिता तत्त्वावर अनेकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु केल्या. त्यात काहींनी मराठी माध्यम देखील घेतले. पण, धक्कादायक बाब म्हणजे शाळा सुरु करताना शालेय शिक्षण विभाग व संलग्नित बोर्डाची मान्यता घेणे बंधनकारक असतानाही काहींनी मान्यतेविनाच शाळा उघडल्या आहेत. या संबंधित शाळांचा शोध घेऊन कारवाई सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर, शहर-जिल्ह्यातील २७ ते ३० शाळांनी मान्यतेसाठी शिक्षण विभागाकडे ऑनलाइन प्रस्ताव सादर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.