कोरोना बाधितांची संख्या जास्त असणाऱ्या 21 गावांत 14 दिवस कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील कोरोना (Covid-19) संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे (Covid Test) प्रमाण वाढविण्यात आले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जाणार आहे. कोरोना बाधितांची संख्या जास्त असणाऱ्या 21 गावांत 14 दिवस कडक लॉकडाउन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. तसेच ज्या गावांत 10 किंवा दहापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असतील, ते संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव (Gajanan Gurav) यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेबाबत सांस्कृतिक भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला तहसीलदार सुशील बेल्हेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, तालुक्यातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते.
श्री. गुरव म्हणाले, लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहतील. विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व दुकानदार, व्यापारी, फळे व भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते यांच्यासह इतर व्यावसायिकांची आठवड्यातून एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मोहिमेत चाचण्या वाढविण्यासाठी "नो टेस्ट, नो रेशन' ही संकल्पना राबविण्यात आली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता 21 गावांत कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी याचे तंतोतत पालन करावे. तसेच पावसाळा सुरू असल्याने इतर साथीचे आजार उद्भवणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाययोजना ग्रामपंचायतीने करावी, असे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी सांगितले. या वेळी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोधले यांनी दिली.
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्हचा दर कमी
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशान्वये पंढरपूरसह पाच तालुक्यात 13 ते 22 ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. या कालावधीत तालुक्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. 1 ते 12 ऑगस्ट 2021 या कालावधीत पॉझिटिव्ह दर 5.86 टक्के होता, यामध्ये 1035 कोरोनाबाधित रुग्ण, 10 पेक्षा जास्त रुग्ण संख्या असलेली गावे 30, एकही रुग्ण नसलेली गावे 18, होम आयसोलेशनमध्ये 419 रुग्ण तर 13 ते 24 ऑगस्ट 2021 या कालावधीत पॉझिटिव्ह दर 3.90 टक्के आहे. यामध्ये 805 कोरोनाबाधित रुग्ण, 10 पेक्षा जास्त रुग्ण संख्या असलेली गावे 19, एकही रुग्ण नसलेली गांवे 22, होम आयसोलेशनमध्ये 169 रुग्ण असल्याचे श्री. गुरव यांनी सांगितले.
या गावात होणार लॉकडाउन
कासेगाव ,भंडीशेगाव, करकंब, गादेगाव, पटवर्धन कुरोली, भोसे, खेड भाळवणी, रोपळे, लक्ष्मी टाकळी, मेंढापूर, गुरसाळे, उपरी, चळे, खरातवाडी, लोणारवाडी, सुपली, गार्डी, खर्डी, सुस्ते, कोर्टी, आंबे या गावांमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.