"या' कोसळलेल्या उद्योगाला हवी "ट्रॅक चेंज'ची गरज; अन्यथा... 

hosiery
hosiery
Updated on

सोलापूर : कोरोनाने सोलापुरातील गारमेंट उद्योगाची स्थिती अत्यंत वाईट करून ठेवली आहे. कोट्यवधींची उलाढाल असणारे युनिफॉर्म मेकिंग युनिट अक्षरश: कोसळले आहेत. त्या ठिकाणी आता परवडत नसतानाही किरकोळ स्वरूपाची मास्क, हॅंडग्लोव्ह्‌जची उत्पादने सुरू आहेत, जी आता कमी होत आहेत. बाजारपेठा बंद असल्याने व शाळा-महाविद्यालये कधी सुरू होतील याचा नेम नसल्याने युनिफॉर्म मेकिंग बंद, फॅन्सी कपड्यांची उत्पादनेही बंद अशा अवस्थेत उदासीनता पसरलेल्या उद्योगाला आता "ट्रॅक चेंज'चा पर्यायच तारू शकतो; अन्यथा कोरोना अजून किती महिने, वर्ष या उद्योगाला मारक ठरू शकतो, हे कोणीही सांगू शकणार नाही. 

सद्य:स्थितीत मुंबईच्या एका उद्योजकाचे सोलापुरात मोठ्या प्रमाणात एक्‍पोर्टची कामे सुरू आहेत. पूर्वी या युनिटमध्ये युनिफॉर्मची उत्पादने मोठ्या प्रमाणात व्हायची. सध्या याव्यतिरिक्त कुठल्याही फॅक्‍टरीमध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू नाहीत. मुंबईचा उद्योजक हा मोठा एक्‍स्पोर्टर असून, त्यांच्या सोलापुरातील युनिटमध्ये युरोप, जर्मनी आदी देशांना एक्‍स्पोर्ट करण्यासाठी बरमोडा, लेडीज पॅंट, लेडीज टॉपची उत्पादने सुरू आहेत. इतकेच नव्हे तर ही कामे दिवसरात्र सुरू असून, इतर छोट्या उत्पादकांकडेही जॉबवर्क दिले जात आहेत. सोलापुरातील उद्योजकांची परिस्थिती पाहता, या उद्योजकाने नाव न छापण्याच्या अटीवर त्यांच्या उत्पादनांविषयी माहिती दिली. त्यांच्या मते, सोलापुरातील उद्योजक स्वत:हून बदलत नाहीत व मिळेल ती पारंपरिक उत्पादने घेण्यात धन्यता मानतात. त्यामुळे आज कोरोना महामारीत त्यांना इतर उत्पादने घेता येत नसल्याने मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 

सोलापुरातील गारमेंट उद्योजक बदल लवकर स्वीकारतात त्यामुळे पूर्वी बंडी, टोप्या शिवणारे आज मोठे युनिफॉर्म मेकर्स झाले आहेत. मात्र आता कोरोनामुळे त्यांना पुन्हा बदल स्वीकारण्याची संधी मिळाली असून, आता त्यांनी होजिअरी उत्पादनांकडे वळणे हिताचे ठरणारे आहे. कारण, होजिअरी उत्पादनांना बारमाही मागणी असते. ही उत्पादने आता त्यांना ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या चार-पाच वेबसाइटवर विक्री करता येऊ शकतात. पुरुष व स्त्रियांसाठीचे इनरवेअर उत्पादनांना मोठी मागणी असल्यामुळे होजिअरी उत्पादनांमध्ये ट्रॅक सूट, टी-शर्ट, बरमोडा, बेबी फ्रॉक, बेबी पिलो, बंडी, बनियान अशा विविधांगी उत्पादनांमध्ये गारमेंट उत्पादकांना संधी आहे. 

होजिअरीसाठी कच्चा माल व मशिनरीही तयार 
गारमेंट उद्योग आधुनिक मशिनरींनी सज्ज आहे. आता त्यांच्याकडे कच्चा माल म्हणून कापडही मोठ्या प्रमाणात पडून आहे. नवीन कच्चा माल खरेदीसाठी भांडवल गुंतवण्याची शक्ती आता त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे उपलब्ध मशिनरी व कच्च्या मालापासून होजिअरी उत्पादने घेऊन मंदीवर मात करण्याची संधी हातून सोडता कामा नये. 

आठ-दहा उत्पादकांनी एकत्र येण्याची गरज 
एकेका उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात उत्पादने घेणे व मार्केटिंग करणे शक्‍य नसल्याने आठ-दहा समविचारी उत्पादकांनी एकत्र येऊन होजिअरी उत्पादनांचा ब्रॅंड तयार केल्यास ब्रॅंडेड कंपन्यांच्या तोडीची उत्पादने तयार होऊ शकतात. 

श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे संचालक अमित जैन म्हणाले, स्वप्नातही वाटले नव्हते की कोरोनामुळे गारमेंट उद्योग कोसळेल. त्यामुळे आता मल्टिपर्पज उत्पादनांशिवाय पर्याय नाही. होजिअरी उत्पादनांमध्ये मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी समविचारी उत्पादकांनी एकत्र येऊन उत्पादने घेणे व मार्केटिंग करणे आवश्‍यक आहे; अन्यथा कामे नसल्याने कामगार व उत्पादकही बेरोजगार होतील. हीच वेळ आहे योग्य निर्णय घेण्याची. त्यासाठी उत्पादकांशी चर्चा-विचारविनिमय करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.