शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १ जानेवारीपासून उजनीतून सुटणार शेतीसाठी पाणी; सोलापूर शहरासाठी २५ डिसेंबरनंतर पाणी

उजनी धरणातून कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडलेले पाणी १५ डिसेंबरला बंद होईल. २५ डिसेंबरनंतर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर १ जानेवारीपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे.
सोलापूर : उजनी धरण
सोलापूर : उजनी धरणsakal
Updated on

सोलापूर : उजनी धरणातून कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडलेले पाणी १५ डिसेंबरला बंद होईल. २५ डिसेंबरनंतर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर १ जानेवारीपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. पण, यासंबंधीचा निर्णय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीत होईल, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार हेक्टर जमिनीला उजनी धरणातील पाण्याचा आधार आहे. उजनीवर अवलंबून जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमधूनही जवळपास दहा हजार हेक्टरवरील जमिनीला पाणी मिळते. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दरवर्षी उजनीतील पाणीसाठ्यावर लक्ष असते.

यंदा सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला आणि पावसाळा संपला त्यावेळी उजनीत ६६ टक्के पाणीसाठा होता. खरीप हंगामात उजनीतील पाण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडून दिलासा देण्यात आला. आता ते पाणी १५ डिसेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यानंतर सोलापूर शहरासाठी १ जानेवारीला औजमध्ये पाणी पोचेल, यादृष्टीने उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. सध्या औज बंधाऱ्यात २.१५ मीटरपर्यंत पाणी लेव्हल आहे. त्यामुळे १ जानेवारीपर्यंत औजमध्ये पाणी पोचेल, अशा नियोजनाने पाणी सोडण्यात येणार आहे.

शेतीचे दुसरे आवर्तन १० फेब्रुवारीपर्यंत

सोलापूर शहरासाठी २५ डिसेंबर दरम्यान पाणी सोडल्यानंतर उजनीची पाणीपातळी घटणार आहे. पाण्याची लेव्हल कमी झाल्यानंतर कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यास अडचणी येतात. त्यामुळे १ जानेवारी २०२४ रोजी धरणातून शेतीला कॅनॉलमधून दुसरे आवर्तन सोडले जाईल. हे पाणी १० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर धरण उणे होईल आणि धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव राहील. त्यावेळी धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील वीजपुरवठा खंडीत करून पाणी उपसा देखील बंद केला जाणार आहे.

अवकाळीमुळे लांबले शहराचे आवर्तन

सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पाऊस जास्त झाल्याने औज बंधाऱ्यातील पाणी पातळी थोडीसी वाढली. तर उन्हाचा पारा देखील फारसा चढलेला नसल्याने बाष्पीभवन जास्त होत नाही. कॅनॉलला पाणी आल्याने बंधाऱ्यातील शेतकऱ्यांचा उपसा कमी झाला. या पार्श्वभूमीवर उजनीतून सोडले जाणारे आवर्तन लांबणीवर पडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.