अलीकडच्या काळामध्ये 13, 14 व 15व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायती मालामाल होत आहेत.
मंगळवेढा (सोलापूर) : अलीकडच्या काळामध्ये 13, 14 व 15व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायती मालामाल होत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत सदस्यापासून ते सरपंच होण्यासाठी अनेकांनी लाखो रकमा खर्च करण्यावर भर दिला आहे. त्यातून पुढे विकासकामांतून 'टक्केवारी' मिळवण्याकडे त्यांचा अधिक कल असल्याचे चित्र दिसत असताना, मंगळवेढा (Mangalwedha) शहरालगत असलेल्या संत चोखामेळा नगर या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीचे सदस्य सुहास पवार (Suhas Pawar) यांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत शासनाकडून मिळणारे उपस्थितीचे मानधन विधायक उपक्रमांसाठी खर्च करून राजकारण्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
स्व. आमदार भारत भालके यांच्या प्रयत्नामुळे शहरालगत चोखामेळा नगर ही स्वंतत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या ग्रामपंचायतीचे पहिले उपसरपंच होण्याचा मान सुहास पवार यांना मिळाला. त्यामध्ये त्यांना मिळणाऱ्या मानधनातून त्यांनी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिकतेचे भान जपण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच त्यांनी आपले पहिले मानधन या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळच्या प्रार्थनेच्या सोयीसाठी स्पीकर व्यवस्थेसाठी दिले. तर दुसऱ्या वर्षी त्याच शाळेचे रंगकाम करण्यासाठी दिले तर तिसऱ्या वर्षी त्यांनी या भागामध्ये "पाणी आडवा - पाणी जिरवा' या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांनी केलेल्या श्रमदान चळवळीला देऊन सामाजिकतेचे भान जपले आहे. चौथ्या वर्षी मिळणाऱ्या मानधनातून या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या अंगणवाडीतील कुपोषित 21 बालकांना त्यांचे कुपोषण कमी व्हावे म्हणून सकस आहार खरेदी करून दिला. तर पाचव्या वर्षी म्हणजे यंदाच्या वर्षातील मानधन ग्रामपंचायतीकडे दिवाबत्तीचे काम करणारे फरीद शेख यांना दीपावली सणानिमित्त दिले.
13, 14 व 15व्या वित्त आयोगातून अलीकडच्या काळामध्ये ग्रामपंचायती मालामाल झाल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांपासून ते सरपंच होण्यासाठी अनेकांनी लाखो रकमा खर्च करण्यावर भर दिला. त्यातून पुढे विकासकामांतून 'टक्केवारी' मिळवण्याकडे अधिक कल असल्याचे चित्र दिसत असताना, सुहास पवार यांच्यासारख्या ग्रामपंचायत सदस्यांनी या गोष्टींना फाटा देऊन विधायक उपक्रम राबविण्यावर भर देण्याचे एक विधायक पाऊल टाकले आहे.
सामाजिक जाणीव लक्षात घेता आतापर्यंत विविध उपक्रम राबवले. त्यामध्ये शासनाकडून मिळणारे मानधन कौटुंबिक खर्चासाठी न वापरता सामाजिक उपक्रमासाठी खर्च करण्याची मानसिकता झाल्यामुळे पाच वर्षांत विविध उपक्रमांवर खर्च केला आहे.
- सुहास पवार, सदस्य, चोखामेळा नगर ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.