सोलापूर - सोलापूरला मंत्रिपद नसल्याचे तोटे काय आहेत? याचा प्रत्यय पदोपदी येऊ लागला आहे. मेडिकल हब म्हणून ओळख साकारत असलेल्या सोलापुरातील दोन शासकीय रुग्णालयांची हेळसांड अवघ्या पाच कोटी रुपयांसाठी सुरू आहे. सोलापुरातील गुरुनानक चौकात होत असलेले १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय व १०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या इमारती पूर्ण झाल्या आहेत.
या रुग्णालयातील फर्निचरसाठी पाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे. अडीच महिन्यांपूर्वी निधी मागणीचा दिलेला प्रस्ताव धूळ खात पडला असून अंतिम टप्प्यात आलेले दोन्ही रुग्णालये निधीच्या प्रतीक्षेत आहेत.सोलापुरात सध्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या जोडीला ही दोन रुग्णालये उभी करण्यात येत आहेत.
या नवीन दोन रुग्णालयांमुळे सर्वोपचार रुग्णालयावर येणारा ताण कमी होणार आहे. या शिवाय सोलापूर परिसरातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सेवा देण्यासाठी ही रुग्णालये महत्त्वाची ठरणार आहेत. या दोन्ही रुग्णालयांच्या फर्निचरसाठी किती निधी आवश्यक आहे? याचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहे.
या अंदाजपत्रकानुसार दोन्ही रुग्णालयांसाठी पाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तत्परता दाखविण्याची आवश्यकता आहे. फर्निचरसाठी पाच कोटी रुपये मिळावेत यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्यावतीने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे व सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली आहे.
निधीची मागणी करून जवळपास अडीच महिने झाले तरीही निधीसाठी ना आरोग्य विभाग पुढे आला, ना जिल्हा नियोजन समिती पुढे आली. धूळखात पडलेल्या प्रस्तावाकडे लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार? फर्निचरचे काम पूर्ण करून ही दोन्ही रुग्णालये रुग्ण सेवेसाठी कधी सज्ज होणार? याचे उत्तर तुर्तास तरी कोणाकडेही दिसत नाही.
देशमुखांनी दिले, भरणेंनी जोपासलेसोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्याकडे असलेल्या आरोग्य खात्यातून ५ नोव्हेंबर २०१६ या दोन्ही रुग्णालयास प्रत्येकी २० कोटी ३३ लाख ९० हजार रुपयांचा निधी देऊन पहिली प्रशासकीय मान्यता दिली होती. २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. २०२० मध्ये कोरोना महामारी आली.
कोरोना महामारीत रुग्णालयांची गरज म्हणून तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या दोन्ही रुग्णालयांना ४ मार्च २०२२ रोजी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. या सुप्रमामुळे जिल्हा रुग्णालयाला ३८ कोटी ३१ लाख १७ हजार ३८४ रुपयांचा तर महिला व नवजात शिशू रुग्णालयाला ३४ कोटी २५ लाख २० हजार २६७ रुपयांचा निधी मिळाला आहे.
तत्कालीन पालकमंत्री देशमुख यांनी दिलेले रुग्णालय त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री भरणे यांनी जोपासले आहे. आताचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील या रुग्णालयासमोरील किरकोळ विषय पूर्ण करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठळक बाबी
१०० खाटांचे जिल्हा रुग्णालय तर १०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय
५ नोव्हेंबर २०१६ ला प्रत्येकी २० कोटी ३३ लाख ९० हजार रुपयांचा निधी अन् पहिली प्रशासकीय मान्यता
४ मार्च २०२२ रोजी सुधारित प्रशासकीय
आता फर्निचरच्या कामासाठी पाच कोटींची आवश्यकता
आरोग्य विभागाकडे अन् जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.