Solapur News : शहरातील अरुंद रस्ते, वाहनांची प्रचंड वाढलेली संख्या, पार्किंगची असुविधा आणि रस्त्यालगत थांबलेल्या वाहनांमुळे अपघात वाढले आहेत.
जानेवारी २०२१ ते २२ जानेवारी २०२२ या काळात शहर हद्दीत तब्बल १४८ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. चिंतेची बाब म्हणजे, जड वाहनांनीच सर्वाधिक बळी घेतले आहेत.
शहरांतर्गत ८० पेक्षा अधिक रस्ते असून त्यातील बहुतेक रस्त्यांवर नेहमीच वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यालगत वाहने लावली जातात. विशेष बाब म्हणजे, काही रस्त्यांवर वाहतूक पोलिसांचे टोईंग वाहन जात नाही म्हणून त्या ठिकाणी कारवाई केली जात नाही.
अशा परिसरात खऱ्या अर्थाने वाहतूक पोलिसांची गरज आहे. दुसरीकडे, जुना पूना नाका परिसरातील पुलाखाली तीन-चार वाहतूक पोलिस थांबतात, पण वाहतूक नियमांचे पालन करायला सांगण्यापेक्षाही ‘दंड’ वसुलीवरच त्यांचा भर असतो. काही अंतरावर चौक असून त्या ठिकाणी मात्र एकही वाहतूक पोलिस दिसत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पादचाऱ्यांना चालणे मुश्कील होते, पण जवळच थांबलेले वाहतूक पोलिस कधी तेथे थांबलेल्या रिक्षांना हाकलण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. पुढे नवीवेस पोलिस चौकीसमोर नेहमीच वाहतूक कोंडी होते, त्या ठिकाणी वाहतूक पोलिस नसतो.
जुना तुळजापूर नाका, जुना बोरामणी नाका, बाजार समिती चौक, आसरा चौक अशा ठिकाणी वाहतूक नियमन करताना कमी अन् वाहतूक पोलिस मोबाईलमध्येच व्यस्त अधिक, अशी स्थिती पाहायला मिळते.
जुने विडी घरकुल परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नसताना तेथे दंड वसुलीसाठी पाच-सहा पोलिसांचे जणू कोम्बिंग ऑपरेशनच सुरू असते.
एकूणच, वाहतूक शिस्त आणि जड वाहनांवरील निर्बंधांची कडक अंमलबजावणी झाल्यास अपघात कमी होतील, असा विश्वास सोलापूरकरांना आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधीतरी अचानक फेरफटका मारावा म्हणजे त्यांना शहरातील बेशिस्त ‘वाहतूक’ची वस्तुस्थिती लक्षात येईल, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जड वाहनांसाठी नियमावली
परवानगी असलेली जड वाहने फक्त मुख्य रोडवरून वाहतूक करतील
परवानगीधारक वाहनाकडून अपघात घडल्यास परवानगी रद्द होईल
जड वाहनांचा स्पीड जास्तीत जास्त ताशी २० किमी राहील
शाळा, कॉलेज, गर्दी परिसरातून जाताना अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी
परवानगीसंबंधीची सर्व कागदपत्रे जवळ असावीत; परवान्यावर बेकायदेशीर मालाची वाहतूक नकोच
डांबर, खडी, दगड, मुरूम वाहतुकीसाठी पोलिसांच्या परवानगीचा वापर करावा; वाहनाच्या काचावर परवाना लावावा
नियम व अटींचा भंग केल्यास थेट गुन्हा
पोलिसांनी ज्या जड वाहनांना परवानगी दिली आहे, त्यांनी नियम व अटींचे पालन तंतोतंत करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आता गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. वाहतूक पोलिसांना अशा वाहनांची कडक तपासणी करावी, असे निर्देश दिले आहेत.
- अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त (वाहतूक), सोलापूर शहर
सात लाख वाहने अन् ‘वाहतूक’ला १४८ कर्मचारी
सोलापुरात वाहतूक पोलिसांचे दक्षिण व उत्तर विभाग असून त्याअंतर्गत अवघे १४८ अधिकारी, कर्मचारी आहेत. १२ लाख लोकसंख्या अन् सात लाखांवर वाहने असतानाही वाहतूक शाखेला पुरेसे मनुष्यबळ नाही, हे विशेष. दुसरीकडे, अनेक कर्मचारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करतात.
अनेकदा १०० ते २०० रुपये घेऊन बेशिस्त वाहनांना सोडून दिले जाते, अशीही चर्चा आहे. अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे पोलिस उपायुक्तांनी स्पष्ट केल्याने भविष्यात वाहतूक पोलिसांवर कोणी तसे आरोप करणार नाही, अशी आशा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना वेळ मिळेना
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती कार्यरत असून, नेहमीच कार्यालयात बसून त्याच्या बैठका होतात, पण प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांची अवस्था, वाहतुकीची समस्या काय आहे, यासंबंधीची माहिती त्यांनी कधी घेतलीय का, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.
मागील दोन वर्षांत शहर-जिल्ह्यात गंभीर अपघात वाढले असून, एक हजार ३१८ जणांचा रस्ते अपघातात जीव गेला आहे. साडेबाराशे लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
केवळ दंडाची आकडेवारी पुढे करून आणि कागदोपत्री बैठका घेऊन अपघात कमी होणार नाहीत. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच फिल्डवर जाऊन परिस्थिती पाहावी लागेल आणि त्यादृष्टीने उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.