सोलापूर : खडकवासला धरण भरल्याने उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. दौण्डवरून मंगळवारी (ता. १२) मध्यरात्रीपर्यंत ४३ ते ४५ हजार क्युसेक वेगाने पाणी उजनीत येत होते. चार दिवसांतील मुसळधार पावसामुळे धरणात तब्बल साडेसहा टीएमसी पाणी आले असून सध्या उजनी धरण प्लसमध्ये आले आहे. रात्री सव्वानऊ वाजता धरण प्लसमध्ये आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात खरीप व रब्बीचे जवळपास सहा लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील बहुतेक क्षेत्राला उजनी धरणाचा आधार आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून कायमस्वरूपी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात उजनीमुळे मोठा बदल झाला आहे. सर्वाधिक ३४ साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरचा नावलौकिक वाढला आहे. रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांची विशेषत: उसाची मोठी लागवड होत आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने उजनी धरणातील पाणीसाठा ८ जुलैला मायनस साडेसहा टीएमसीपर्यंत खाली गेला होता. पण, ९ जुलैपासून सुरु झालेल्या पावसामुळे उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग वाढला आणि चार दिवसांतच उजनी धरण प्लसमध्ये आले आहे. दरम्यान, उजनी प्लसमध्ये आल्याने सोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. उजनीतून शेतीसह अनेक उद्योगांना व शहरांना पाणी पुरवठा होतो. त्यामुळे त्यांचेही उजनी १०० टक्के कधी भरणार याकडे लक्ष असते.
नदीकाठच्यांना अद्याप धोका नाहीच
उजनी धरणात सध्या ६३.६४ टीएमसी पाणीसाठा आहे. अजूनही धरणात ५५ टीएमसी पाणी मावते. त्यामुळे खडकवासला धरण भरल्याने बंडगार्डन व दौण्डवरून उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग वाढला, तरीही नदी काठावरील नागरिकांना तुर्तास कोणताही धोका नाही. पण, पाऊस वाढत असल्याने त्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.